घरस्पोर्ट्सव्हीलचेअरवरून जागतिक भरारी; भाविनाचा ऐतिहासिक पराक्रम!

व्हीलचेअरवरून जागतिक भरारी; भाविनाचा ऐतिहासिक पराक्रम!

भारतीय पॅरा टेबल टेनिसमधील आघाडीच्या खेळाडू भाविना पटेल यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. शारीरिक आव्हानांवर मात करत त्यांनी देशासाठी अनेक पदके जिंकली. विशेष म्हणजे, पॅरालिम्पिकमध्ये भारताला पॅरा टेबल टेनिसमधील पहिले पदक मिळवून देण्याचा ऐतिहासिक पराक्रमही त्यांच्या नावावर आहे.

भाविना पटेल यांचा जन्म ६ नोव्हेंबर १९८६ रोजी गुजरातमधील मेहसाणा येथे झाला. वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी त्यांना पोलिओची लागण झाली. त्यामुळे त्यांच्या उजव्या पायावर परिणाम झाला. मात्र, आई-वडिलांनी त्यांच्या शारीरिक अडचणीला कधीही कमजोरी बनू दिले नाही. उलट त्यांना आयुष्यात काहीतरी मोठे करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

२००७ मध्ये भाविना ब्लाइंड पीपल्स असोसिएशनमध्ये कॉम्प्युटर कोर्स करण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी काही मुलांना टेबल टेनिस खेळताना पाहून त्यांच्या मनात या खेळाविषयी आवड निर्माण झाली. त्यानंतर प्रशिक्षक ललन दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी टेबल टेनिसचे प्रशिक्षण सुरू केले. व्हीलचेअरवर बसून खेळणे सुरुवातीला आव्हानात्मक होते; मात्र जिद्द आणि कठोर सरावाच्या जोरावर त्यांनी या अडचणींवर मात केली.

२००९ मध्ये जॉर्डन येथे झालेल्या स्पर्धेतून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. २०११ मध्ये थायलंड ओपनमध्ये चिनी खेळाडूला पराभूत करत रौप्यपदक जिंकले. त्यानंतर २०१३ मध्ये बीजिंग येथे झालेल्या आशियाई पॅरा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारताला पहिले रौप्यपदक मिळवून दिले.

२०२० टोकियो पॅरालिम्पिकमधील कामगिरीने भाविना यांना जगभरात ओळख मिळवून दिली. महिला एकेरीच्या क्लास-४ गटात त्यांनी अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. अंतिम सामन्यात चीनच्या झोऊ यिंग यांच्याकडून २-३ असा पराभव झाला. त्यामुळे त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मात्र, हे पदक ऐतिहासिक ठरले. पॅरा टेबल टेनिसमध्ये भारताला मिळालेले हे पहिलेच पॅरालिम्पिक पदक होते.

भाविना यांनी २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आपल्या यशात आणखी एक मानाचा तुरा खोवला. २०१८ च्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी रौप्य, तर २०२२ मध्ये हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. २०२६ च्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेतही त्यांनी कांस्यपदक जिंकले.

त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल २०२१ मध्ये त्यांना प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शारीरिक मर्यादांवर मात करून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवणाऱ्या भाविना पटेल यांचा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते, हे त्यांनी आपल्या कामगिरीतून सिद्ध केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version