भारतीय क्रिकेट संघाचा माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर याने विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय शतकांच्या शंभरीबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी विराट कोहलीला १०० आंतरराष्ट्रीय शतके पूर्ण करण्यासाठी पुरेसे सामने मिळणार नाहीत, असे मत नायरने व्यक्त केले आहे. त्यामुळे विराटच्या शतकांच्या शंभरीचे लक्ष्य विश्वचषकापूर्वी पूर्ण होणे कठीण असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
नायरने जिओस्टारशी बोलताना सांगितले की, विश्वचषकापर्यंत विराटकडे हा विक्रम गाठण्यासाठी पुरेसे सामने असतील, असे वाटत नाही. विराटने हा टप्पा गाठावा, अशी आपली इच्छा असली तरी त्यासाठी मोठ्या संख्येने सामने खेळणे आवश्यक आहे. कदाचित विराट विश्वचषकानंतरही क्रिकेट खेळत राहील; मात्र विश्वचषकानंतर त्याची प्रेरणा सध्यासारखी राहीलच असे नाही, असेही नायरने नमूद केले.
दरम्यान, नायरने भारतीय संघाच्या भविष्यातील संघबांधणीबाबतही महत्त्वाचे मत मांडले. हार्दिक पंड्याच्या जोडीला आणखी एका अष्टपैलू खेळाडूला तयार करण्याची गरज असल्याचे त्याने सांगितले. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांमध्ये खेळताना दोन वेगवान गोलंदाजी करणारे अष्टपैलू खेळाडू संघासाठी उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळे फलंदाजीला अधिक खोली मिळेल आणि संघाचे संतुलनही सुधारेल, असे नायरचे मत आहे.
भारताने दोन दर्जेदार वेगवान गोलंदाज आणि दोन सीम गोलंदाजी करणारे अष्टपैलू खेळाडू अशा संयोजनासह मैदानात उतरल्यास संघाची ताकद वाढेल, असेही त्याने स्पष्ट केले.
याशिवाय, त्रिकोणी किंवा त्यापेक्षा अधिक देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धांचे महत्त्वही नायरने अधोरेखित केले. अशा स्पर्धांमध्ये प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. गुणतालिकेतील स्थानासाठी प्रत्येक संघाला झुंजावे लागते. अंतिम फेरीत ट्रॉफीसाठी खेळण्याचा अनुभव मोठ्या स्पर्धांच्या तयारीसाठी उपयुक्त ठरतो, असे त्याने सांगितले.
