घरस्पोर्ट्समेसीच्या जादुई पासवर अर्जेंटिनाची कमाल!

मेसीच्या जादुई पासवर अर्जेंटिनाची कमाल!

इंग्लंडला २-१ ने हरवत सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक

गतविजेत्या अर्जेंटिनाने अखेरच्या क्षणांतील दमदार पुनरागमन करत इंग्लंडवर २-१ अशी थरारक मात केली आणि फीफा विश्वचषक २०२६च्या अंतिम फेरीत सलग दुसऱ्यांदा प्रवेश केला. अटलांटा स्टेडियमवर रंगलेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीत लिओनेल मेसीच्या दोन निर्णायक असिस्टमुळे अर्जेंटिनाने सामना अक्षरशः हिसकावून घेतला.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. इंग्लंडने अधिक हल्ले चढवत गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या, मात्र अर्जेंटिनाच्या भक्कम बचावामुळे पहिला हाफ गोलशून्य बरोबरीत संपला.

दुसऱ्या हाफमध्ये इंग्लंडने आक्रमणाची धार अधिक तीक्ष्ण केली. ५५व्या मिनिटाला मॉर्गन रॉजर्सच्या अचूक पासवर अँथनी गॉर्डनने शानदार गोल करत इंग्लंडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतरही इंग्लंडने आक्रमण सुरू ठेवले, पण अर्जेंटिनाने संयम सोडला नाही.

८५व्या मिनिटाला लिओनेल मेसीच्या अप्रतिम पासवर एन्झो फर्नांडेजने गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. सामना अतिरिक्त वेळेत जाणार असे वाटत असतानाच इंज्युरी टाइममध्ये मेसीने पुन्हा एकदा आपली जादू दाखवली.

मेसीच्या अचूक पासवर लाउतारो मार्टिनेजने विजयी गोल झळकावत अर्जेंटिनाला २-१ अशी संस्मरणीय विजय मिळवून दिला. अवघ्या सात मिनिटांत दोन गोल करत अर्जेंटिनाने पराभवाच्या उंबरठ्यावरून विजय खेचून आणला.

आता विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा सामना स्पेनशी होणार आहे. स्पेनने पहिल्या उपांत्य फेरीत फ्रान्सचा २-० असा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. दरम्यान, इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यात तिसऱ्या स्थानासाठी सामना रंगणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version