गांधी जयंती दिवशी जंतर मंतर आणि शिवाजी पार्क येथील आंदोलनाचा फज्जा उडला. रोज रविवार नसतो हे एव्हाना अभिजित दिपकेच्या लक्षात आले असेल. परराज्यातून माणसे गोळा करून आकडा दोन-तीन हजारांवर गेला नाही. मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरू केल्यापासून त्यांचा कडेलोट व्हायला काही वर्षे जावी लागली. इथे जंतर मंतरच्या पहिल्या आंदोलनानंतर दुसऱ्या आंदोलनापर्यंत दिपकेची वाटचाल जरांगे बनण्याच्या दिशेने सुरू झालेली आहे.
शिवाजी पार्क येथील आंदोलनात बोलताना दिपकेने देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना धमकी दिली आहे. त्यानंतर उगाचच मनोज जरांगे यांची आठवण झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या सौभाग्यवती, त्यांच्या मातोश्री, पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्यांना या माणसाने शिव्या घातल्या होत्या. “आम्ही मोदींना सत्तेवर बसवले, राज्यात भाजपला सत्तेवर बसवले,” असे विनोदी दावे हा माणूस करायचा. वेळ जेव्हा बरी असते तेव्हा शिव्या आणि असले दावेही खपून जातात. वेळ खराब येते, तेव्हा ज्यांनी उपोषण सोडण्यासाठी फळांचा रस पाजला, तेच सांगायला लागतात की, “हा कसले उपोषण करायचा ते आम्हाला माहिती आहे, जरांगेंनी देशाची माफी मागावी.”
हे ही वाचा:
ओवैसींनी केले स्मितचे कौतुक, पण ठाकरे थंडच!
मुंबईसह निम्म्या महाराष्ट्रातून मान्सूनची माघार
हॉटेलच्या खोलीत २७ वर्षीय डॉक्टर तरुणीचा मृतदेह
अखेरच्या टप्प्यात ११ सुवर्ण जिंकत भारत ठरला चौथा
देशभरातील अशा आंदोलनजीवींकडे नजर टाकली तर त्यांच्या घसरणीचे टप्पे लक्षात येतात. आंदोलने सुरू करणे, थोडी गर्दी जमली की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्या घालणे, शिव्या घालूनही काही कारवाई झाली नाही की मिशांना पिळ देत सरकार उलथवण्याच्या धमक्या देणे. इथपर्यंत सगळे बरे चाललेले असते, पुढे आंदोलननिहाय प्रत्येकाची स्थिती वेगळी होते.
काही कोषात शिरतात, राकेश टिकैत यांचे उदाहरण आहे. काही भाजपमध्ये प्रवेश करतात, हार्दिक पटेलचे उदाहरण देता येईल. काही आरोपांच्या घेऱ्यात असे अडकतात की त्यांची बोलती बंद होते. जरांगेंची ती परिस्थिती झालेली आहे. अभिजित दिपकेचे तोंड ज्या प्रकारे सुटले आहे, ते पाहता त्याचा लवकरच जरांगे होईल अशी शक्यता आहे.
अण्णा हजारे यांच्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अर्वाच्य शब्दांत वक्तव्य करून दिपकेने अनेक वेळा आपली लायकी सिद्ध केली आहे. आता अमित शाह यांना त्याने दम दिला आहे. “लाठीमार झाला तर म्हणे तुमचा राजीनामा.” दिपके कोणत्या मूर्खांच्या जगात वावरतोय देव जाणे. अमित शाह ज्यांनी काँग्रेससारख्या शतायुषी पक्षाला पाणी पाजले आहे, त्यांना आपण धमकी देऊ शकतो असे दिपकेला वाटणे, हे त्याचा वाईट काळ सुरू झाल्याचे संकेत आहेत. मविआच्या सत्ताकाळात उद्धव ठाकरे यांना अशीच दुर्बुद्धी सुचली होती. तेसुद्धा सुसाटले होते. मोदी-शाहांकडे काय टोटका आहे कोण जाणे, जे त्यांना शिव्या घालतात त्यांचा बाजार उठतो. सोनिया गांधींपासून केजरीवालांपर्यंत बरीच उदाहरणे सांगता येतील.
दोन-तीन हजार आंदोलक शिवाजी पार्कवर जमा करण्यासाठी दिपकेला दिल्ली, बंगळुरू, हैदराबादसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून माणसे गोळा करावी लागली. मुंबईकर आंदोलनात फिरकलेच नाहीत. अनेकांनी जाहीर विरोध मात्र केला.
जे बाहेरून आले ते खिशातला पैसा खर्च करून आले असतील असे मानणे भाबडेपणाचे आहे. मुंबईत त्यांच्या मुक्कामाची व्यवस्थाही करण्यात आलेली असणार. हा फायनान्सर कोण, त्याचा उलगडा आज ना उद्या होईल. गोव्यातील निवडणुकांमध्ये केजरीवाल यांनी मद्य घोटाळ्यातील पैसा वापरल्याचे उघड झाले, तसेच.
शिवाजी पार्कातील स्थानिकांचा आंदोलनाला विरोध होता. त्यापैकी अनेकांनी तक्रारही दाखल केली आहे. काल परवानगीशिवाय झालेल्या आंदोलनाच्या संदर्भात शिवाजी पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जंतर मंतरप्रमाणे इथेही कॅमेऱ्याची नजर होती. प्रत्येक ठिकाणी आंदोलकांची शिरगणती आणि चेहरेपट्टी केली जात आहे.
मुळात ज्या कारणासाठी हे आंदोलन करण्यात आले, त्याची कधीच हवा निघाली आहे. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनसह अन्य सर्व महत्त्वाचे निर्णय एकमताने झाल्याचे तिन्ही निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. २०२५ च्या मतदार याद्यांनुसार आंदोलन घ्या, ही मागणी करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा. मृतांची, स्थलांतरितांची नावे मतदार यादीत यांना का हवी आहेत, की हा आग्रह बांगलादेशी आणि रोहिंग्यांसाठी आहे?
तोंडाला येईल त्या व्यक्तीचा राजीनामा दिपके आणि त्याची टोळी मागते आहे. कोणाला त्या पदावर बसवायचे, त्यांची नावेही सुचवली जात आहेत. म्हणजे जनतेने जे सरकार सत्तेवर बसवले, त्यांनी या उपटसुंभाच्या तालावर नाचावे ही त्यांची इच्छा आहे.
एकच विधान सातत्याने केले की लोकांचा हळूहळू विश्वास बसू लागतो. १९७७ मध्ये लिन हॅशर, डेव्हिड गोल्डस्टाईन आणि थॉमस टिपिनो या तिघांनी सिद्ध केलेली ही थिअरी आहे. याला ‘इल्यूजरी ट्रुथ इफेक्ट’ (Illusory Truth Effect) म्हणतात. या थिअरीवर दिपकेसारख्या लोकांचा विश्वास वाढतो आहे. परंतु पश्चिमेतील सगळ्या थिअरी भारतात चालतात असे नाही. भारतीय मानस पंचतंत्रातील कथा ऐकून सुजाण झाले आहे. त्यांना ‘लांडगा आला रे…’ पासून सगळ्याच कथा माहिती आहेत.
लायकी नसताना दिपके ज्या प्रकारे मिशांना पिळ देतो आहे, ते त्याच्यासाठी धोकादायक आहे. विनाकारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने शिमगा करणाऱ्यांची अवस्था पाहूनही त्याला शहाणपण येताना दिसत नाही. भारतीयांना नकारात्मकता आवडत नाही. मोदींनी सत्तेवर आल्यापासून दणक्यात विकास तर केलाच, शिवाय हिंदूंच्या आस्था जपण्याचे, सनातनचा गौरव वाढवण्याचे काम केले. हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू आस्थांची प्रतीके यांची पोटदुखी असलेल्या सोनिया गांधी, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी यांनी त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. सोनियांची भाटगिरी स्वीकारलेल्या उद्धव ठाकरे यांनी हाच मार्ग स्वीकारला. सगळ्या प्रयत्नांचे बुमरँग झाले. या सगळ्यांना आता सत्ता फार दूर गेली असल्याचे लक्षात आले आहे. दिपके यांच्या जीवावर उड्या मारतो आहे.
काल शिवाजी पार्कच्या आंदोलनात उबाठा शिवसेनेचे आमदार महेश सावंत हजेरी लावायला आले होते. “आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” अशी जाहीर घोषणा करून त्यांनी दिपके आणि टोळीचे समर्थन केले. परंतु सावंत ज्या पक्षाचे आहेत, त्या पक्षाच्या पाठी आता किती लोक उरले आहेत, याचा त्यांनी विचार करायला हवा.
ममता बॅनर्जी ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीत आल्या होत्या. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना त्या चोर आणि डाकू म्हणाल्या. त्यांच्या पक्षातील लोकांची परिस्थिती अशी आहे की पश्चिम बंगालच्या रस्त्यावर लोक त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवर अंडी मारत आहेत. दिपकेच्या मागे मुठभर लोक आहेत, तेही त्याचे स्वतःचे नाहीत. कधीकाळी ज्यांनी डावे आणि काँग्रेस यांना एकत्रित टक्कर दिली, त्या ममता बॅनर्जी यांनी सातत्याने मोदींना शिव्या घातल्या आणि स्वतःची राजकीय कबर खोदून घेतली. आता अंड्यांमुळे धास्तावल्या आहेत. यातून धडा घेण्याइतपत मेंदू दिपकेजवळ असण्याची शक्यता नाही, अन्यथा मोदींनंतर अमित शाह यांना दम देण्याचे धाडस त्याने केले नसते.
मोदींना दिलेल्या शिव्यांची प्रतिक्रिया लोकांकडून येते आहे, याचे कारण मोदींवर असलेले प्रेम हे असेलही, नसेलही. हा विषय त्याच्या पलीकडचा आहे. जे गर्दी जमवून ताकद दाखवत असतात, त्यांच्याकडे समाजाला देण्यासारखे काही सकारात्मक, रचनात्मक आहे काय, आपले भले करण्याचा काही विचार किंवा रोडमॅप यांच्याकडे आहे काय, याचा विचार सर्वसामान्य माणूस नेहमी करत असतो. सगळ्याच लोकांना मोदींचा चेहरा आवडत असेल असे नाही, परंतु राहुल गांधी, दिपके यांच्यासारखे लोक आपले काही भले करू शकणार नाहीत, हे समजण्याइतपत अक्कल सर्वसामान्यांना आहे. सत्तेचा स्पर्श झालेला नसताना अण्णा हजारे यांच्यासारख्या बुजुर्ग सामाजिक कार्यकर्त्यासाठी अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या दिपकेचे किती ज्येष्ठ नागरिक समर्थन करू शकतील? कुलंगडी बाहेर येण्याच्या भीतीने जरांगे धास्तावलेले आहेत; दिपकेवर ती वेळ लवकरच येणार आहे.
(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
