एशियन गेम्स २०२६ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने पुन्हा एकदा सुवर्णाक्षरांनी इतिहास लिहिला. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा अंतिम सामन्यात १९ धावांनी पराभव करत भारताने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. अभिषेक शर्माची तुफानी ६१ धावांची खेळी, उपकर्णधार तिलक वर्माची नाबाद ५१ धावांची झंझावाती खेळी आणि गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर भारताने सुवर्णमुकुट कायम राखला.
कोरोगी स्पोर्ट्स पार्कच्या मैदानावर भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ६ बाद २११ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानला २० षटकांत ६ बाद १९२ धावांपर्यंतच मजल मारता आली.
अभिषेकचा झंझावात, तिलकचा तडाखा
भारताची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. वैभव सूर्यवंशी १५, संजू सॅमसन २, कर्णधार श्रेयस अय्यर २१, तर ईशान किशन २० धावा करून बाद झाला. मात्र, अभिषेक शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांवर जोरदार प्रतिहल्ला चढवला. त्याने अवघ्या २८ चेंडूंत ३ चौकार आणि ७ षटकारांसह ६१ धावा फटकावल्या.
त्यानंतर उपकर्णधार तिलक वर्माने डावाला आणखी वेग दिला. त्याने केवळ २२ चेंडूंत ३ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ५१ धावा केल्या. तिलक आणि शिवम दुबे (२७ धावा) यांनी सहाव्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी करत भारताला २११ धावांच्या भक्कम धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
पाकिस्तानची झुंज अपयशी
२१२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. साहिबजादा फरहान १०, उस्मान खान ३, तर माज सदाकत २३ धावांवर माघारी परतला. अवघ्या ३९ धावांत ३ विकेट गमावल्याने पाकिस्तान दबावात आला.
हसन नवाज आणि सॅम अयूब यांनी चौथ्या विकेटसाठी ४८ चेंडूंत ८७ धावांची भागीदारी करत पाकिस्तानच्या आशा जिवंत ठेवल्या. अयूब २९ धावांवर बाद झाला. हसन नवाजने मात्र भारतीय गोलंदाजांना कडवी झुंज देत ५१ चेंडूंत ५ चौकार आणि ७ षटकारांसह ९६ धावा केल्या. त्याची ही खेळीही पाकिस्तानला विजय मिळवून देऊ शकली नाही.
भारताकडून अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी २ विकेट घेत पाकिस्तानला १९२ धावांवर रोखले.
सलग दुसऱ्यांदा सुवर्णझळाळी
अंतिम सामन्यातील १९ धावांच्या विजयासह भारताने एशियन गेम्समधील आपले सुवर्णपदक कायम राखले. सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकत भारतीय संघाने देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. पाकिस्तानला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
