घरविशेषलाहोर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर!

लाहोर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर!

एक्यूआय थेट ५३८ वर

प्रदूषणाच्या संकटाने आता पाकिस्तानला अक्षरशः वेठीस धरले असून, लाहोर पुन्हा एकदा जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे. रविवारी सकाळी लाहोरचा हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) थेट ५३८ वर पोहोचला, जो मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक मानला जातो. स्थानिक वृत्तपत्र ‘डॉन’च्या अहवालानुसार, कारखाने व वाहनांमधून होणारे विषारी उत्सर्जन रोखण्यात प्रशासनाला आलेले अपयश आणि ढासळते पर्यावरणीय संतुलन यामुळे पाकिस्तानात आरोग्य आणीबाणीसदृश स्थिती निर्माण झाली आहे.

स्विस वायू गुणवत्ता निरीक्षण प्लॅटफॉर्म ‘आयक्यूएअर’ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीने सर्वांचीच झोप उडवली आहे. रविवारी सकाळी ९ ते १० या वेळेत लाहोरचा एक्यूआय ५३८ वर पोहोचला होता. या जागतिक यादीत लाहोर पहिल्या क्रमांकावर असून, १८० एक्यूआयसह पाकिस्तानचेच कराची शहर दुसऱ्या आणि १६२ एक्यूआयसह इजिप्तमधील कैरो तिसऱ्या स्थानी राहिले. लाहोर आणि दुसऱ्या क्रमांकावरील कराची यांच्यातील तफावत पाहता, लाहोरमधील हवा किती विषारी झाली आहे, याचा सहज अंदाज येतो.

हे पर्यावरणीय संकट केवळ लाहोर शहरापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर संपूर्ण पाकिस्तानच्या पंजाब प्रांताला या विषारी धुक्याने आपल्या विळख्यात घेतले आहे. आयक्यूएअरच्या अहवालानुसार, पाकिस्तानमधील १० सर्वाधिक प्रदूषित शहरी केंद्रांपैकी तब्बल ८ शहरे एकट्या पंजाब प्रांतातील आहेत. यामध्ये लाहोर जिल्ह्यातील ‘काहना नौ’ या भागात देशातील सर्वात खराब हवेची गुणवत्ता नोंदवली गेली असून, येथील एक्यूआय तब्बल ६०६ इतका भयानक होता. त्यापाठोपाठ लाहोर (५३८), बहावलपूर (५३६), सरगोधा (३९२) आणि गुजरानवाला (३४७) या शहरांचा क्रमांक लागतो. याशिवाय मुलतान, डेरा गाझी खान, स्कार्दू, फैसलाबाद आणि पेशावर या प्रमुख शहरांमधील हवेची गुणवत्ताही अत्यंत खालावली आहे. या विषारी हवेमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दम्याचा त्रास असलेल्या रुग्णांचे जगणे कठीण झाले आहे.

लाहोरचे मुख्य वाहतूक अधिकारी सय्यद अब्दुल रहीम शिराझी यांनी शनिवारी माहिती दिली की, वाहतूक पोलिसांनी पर्यावरणाचे नियम मोडणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम राबवली आहे. या अंतर्गत प्रचंड धूर सोडणाऱ्या १४,६५३ वाहनांना चलन बजावण्यात आले आहे. तसेच, वाळू, माती आणि बांधकाम साहित्य ताडपत्रीने न झाकता वाहून नेणाऱ्या १०,३०६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय, खराब अवस्थेतील ३१,६१८ वाहनांना दंड ठोठावण्यात आला असून क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणाऱ्या तब्बल २,७२,७६० वाहनांवर दंडात्मक कारवाई केली गेली आहे.

हे ही वाचा:

कोयनेचे समुद्रात जाणारे ६७ टीएमसी पाणी मुंबईच्या वाटेला!

चीन सीमेलगतच्या ४० गावांमध्ये लोकसंख्या वाढली

सीमेवर घातपाताचा डाव हाणून पाडला; शस्त्रसाठ्यासह हेरॉईन जप्त

इंदिरा गांधींच्या सरकारने पक्ष कार्यकर्त्यांना न्यायाधीश नेमले

याचबरोबर, पंजाब पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदल विभागाने विटांच्या भट्ट्यांवरही मोठा बडगा उगारला आहे. १ जानेवारी ते १८ नोव्हेंबर या कालावधीत प्रांतभरातील विटांच्या भट्ट्यांच्या ८४,३७० तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये नियम मोडणाऱ्या १,४२९ भट्ट्या जमीनदोस्त करण्यात आल्या, ९६८ भट्ट्या सील केल्या गेल्या आणि १,२४८ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले. विशेषतः धुके सर्वात जास्त दाटण्याच्या काळात (१ सप्टेंबर ते १८ नोव्हेंबर) विभागाने २९,९९९ तपासण्या करून ५१९ भट्ट्या पाडल्या आणि ४९४ सील केल्या, तसेच १०१.४५ दशलक्ष पाकिस्तानी रुपयांचा दंड वसूल केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version