महाराष्ट्रात तरुणींचे लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक आणि आर्थिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोहम्मद माजिन मोहम्मद अब्दुल रशीद याला संयुक्त अरब अमिरातीमधून (यूएई) भारतात आणले आहे. काजीवाडा परिसरातील रहिवासी असलेल्या माजिनने लग्नाचे आश्वासन देऊन १४ हिंदू तरुणींना आपल्या जाळ्यात ओढल्याचा आणि त्यांचे लैंगिक व आर्थिक शोषण केल्याचा आरोप आहे.
शुक्रवारी रात्री त्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये आणण्यात आले. त्यानंतर शनिवारी, २१ नोव्हेंबर रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजिन तरुणींचे आक्षेपार्ह व्हिडिओ गुप्तपणे तयार करत असे. त्यानंतर तो दुबईला पळून गेला होता. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, माजिन ठरावीक कालावधीनंतर आपले कामाचे ठिकाण बदलत असे. तेथे हिंदू तरुणींशी मैत्री करून त्यांना लग्नाचे आश्वासन देत असे. त्यानंतर लग्नाच्या बहाण्याने त्यांना हॉटेलमध्ये घेऊन जाऊन त्यांचे शोषण करत असे. वैद्यकीय उपचारांसह वेगवेगळी कारणे सांगून तो तरुणींकडून पैसे उकळत असे. तसेच, तरुणींनी लग्नासाठी दबाव आणल्यास त्यांचे गुप्त व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत असे.
या प्रकरणाचा उलगडा १ डिसेंबर २०२५ रोजी झाला. एका २८ वर्षीय तरुणीने सिटी चौक पोलीस ठाण्यात माजिनविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, जून २०२० मध्ये माजिनने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. त्याने तिची आपल्या कुटुंबीयांशीही ओळख करून दिली होती. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून त्याने तिच्याकडून तब्बल १८ लाख रुपये उकळले. २०२२ मध्ये आपले आधीच लग्न झाले असल्याची माहिती संबंधित तरुणीला समजली. त्यानंतर तिच्यावर हल्ला करण्यात आला आणि दोघांचे खासगी फोटो प्रसारित करण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर माजिन सुमारे महिनाभरापूर्वी दुबईला पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा:
इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी विजयी आयझेनकोट यांनी नेतान्याहूंनाच दिले आमंत्रण
सीमेवर घातपाताचा डाव हाणून पाडला; शस्त्रसाठ्यासह हेरॉईन जप्त
कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे ७०० धावांचे पंचक
भारताने ७२० धावांचा डोंगर उभारून न्यूझीलंडविरुद्ध घेतली पकड
सीबीआयच्या माहितीनुसार, माजिनने देशभरातील किमान १४ महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडे आतापर्यंत स्थानिक महिलांच्या चार स्वतंत्र तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्रकरणात आणखी काही महिलांना लक्ष्य करण्यात आले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे संभाव्य पीडित महिलांची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणींना जाळ्यात ओढण्यासाठी माजिनने औरंगपुरा परिसरातील दोन हॉटेल्सची निवड केली होती. कॅफेमध्ये जाण्याच्या बहाण्याने तो तरुणींना थेट या हॉटेल्समध्ये घेऊन जात असे. या हॉटेल्समध्ये ओळखपत्राशिवाय प्रवेश मिळत असल्याचा त्याला फायदा होत होता. माजिनच्या वारंवार होणाऱ्या भेटींमुळे त्याचे या हॉटेल्समध्ये क्रेडिट खाते असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे ही दोन्ही हॉटेल्स आता पोलिसांच्या तपासाच्या कक्षेत आली आहेत.
