रणबीर कपूर आणि यश यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाभोवतीचा वाद आता अधिक तीव्र झाला आहे. विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) या चित्रपटाचे सेन्सॉर प्रमाणपत्र रद्द करण्याची आणि चित्रपटाचे थिएटरमधील प्रदर्शन थांबवण्याची मागणी केली आहे. विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांवर महाकाव्यातील घटनांचे चित्रण चुकीच्या पद्धतीने केल्याचा आणि रावणाचे उदात्तीकरण केल्याचा आरोप केला आहे. विहिंपचे सरचिटणीस बजरंग लाल बागरा यांनीही चित्रपटावर टीका केली. हा चित्रपट महर्षी वाल्मिकी यांच्या मूळ रामायणापासून दूर गेल्याचा दावा त्यांनी केला. चित्रपटात काल्पनिक घटनांचा समावेश करण्यात आला असून, महत्त्वाच्या पात्रांना वगळण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
विहिंपने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चित्रपटाच्या माध्यमातून राजकीय कथानक पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर भगवान श्रीराम यांच्या एक अब्जाहून अधिक भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
चित्रपटाबाबतच्या आक्षेपांवर बोलताना आलोक कुमार म्हणाले, “आम्ही अलीकडेच ‘रामायण’ चित्रपट पाहिला आणि त्याचा आढावा घेतला. या चित्रपटाबाबत आमचे काही आक्षेप आहेत. ऐतिहासिक घटनांमध्ये फेरफार करण्यात आला असून, काही काल्पनिक घटनांचा समावेश करण्यात आला आहे. केवळ चित्रपट मनोरंजक बनवण्यासाठी नाट्यमय प्रसंग जोडण्याचा हा प्रयत्न नाही, तर रामकथेच्या मूलभूत मूल्यांवरच यामुळे आघात होत आहे.”
हे ही वाचा:
इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी विजयी आयझेनकोट यांनी नेतान्याहूंनाच दिले आमंत्रण
लग्नाचे आमिष दाखवून तरुणींची फसवणूक करणाऱ्याला दुबईतून आणले भारतात
उद्घाटनानंतर ‘नितीश सेतू’वर लालू समर्थकांचा हैदोस
पाऱ्यापासून सोनं तयार करण्याचा अमेरिकन कंपनीचा दावा
ते पुढे म्हणाले की, भगवान श्रीराम यांनी १४ वर्षांचा वनवास भोगताना समाजातील सर्व स्तरांतील लोकांची भेट घेतली. त्यांनी संन्याशाप्रमाणे वेश धारण केला होता आणि अनवाणी प्रवास केला होता. महिलांच्या सन्मानाशी संबंधित महत्त्वपूर्ण कृती करताना त्यांनी माता अहिल्येच्या आश्रमाला भेट देऊन त्यांना पुन्हा प्रतिष्ठा आणि सन्मान मिळवून दिला होता.
आलोक कुमार यांनी पुढे सांगितले की, भगवान श्रीराम आणि भरत यांनी निषादराज यांना आपला मित्र मानले आणि त्यांच्याशी समानतेने वागले. त्यांच्याशी मैत्रीचे नाते जोडून स्पृश्य-अस्पृश्य किंवा उच्च-नीच असा कोणताही भेद नसल्याचा संदेश त्यांनी दिला. प्रेमाचे नाते महत्त्वाचे असल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. केवट यांच्याशी भगवान श्रीराम यांनी केलेले वर्तनही सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने होते. रामायणातील हे अत्यंत महत्त्वाचे प्रसंग असून, चित्रपटात त्यांचे चित्रण करण्यात आलेले नाही, असा आक्षेप त्यांनी घेतला.
याशिवाय चित्रपटात रावणाचे सकारात्मक पद्धतीने चित्रण करण्यात आले असून, त्याचे व्यक्तिमत्त्व मोठे करून दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही आलोक कुमार यांनी केला. ते म्हणाले, “चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच रावणाला दलित, शोषित आणि वंचितांचा मुक्तिदाता म्हणून दाखवण्यात आले आहे. तो या समाजाच्या कल्याणासाठी काम करत असल्याचे चित्रण करण्यात आले आहे. हा रावणाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न आहे.”
पारंपरिक रामायणात भगवान श्रीराम आणि सीतेचा प्रवास तसेच चांगल्याचा वाईटावर झालेला विजय यावर भर दिला जातो. मात्र, नमित मल्होत्रा यांनी तयार केलेल्या या चित्रपटात रावणालाही महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. अभिनेता यशने रावणाची भूमिका साकारली असून, त्याच्या व्यक्तिरेखेकडे प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधले गेले आहे. अनेक प्रेक्षकांनी यशच्या या भूमिकेचे कौतुकही केले आहे. मात्र, रावणाच्या व्यक्तिरेखेबद्दल वाढत असलेली प्रशंसा हा विहिंपच्या आक्षेपांपैकी एक मुद्दा असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच आता विहिंपने हा चित्रपट चित्रपटगृहांमधून मागे घेण्याची मागणी केली आहे.
