आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सरची शानदार कामगिरी सुरूच आहे. अंकुश पंघाल याने पुरुषांच्या ८० किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत फजलिद्दीन एर्किनबोव याचा ४-१ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंकुशने उपांत्य फेरीत एर्किनबोवविरुद्ध पिछाडीवरून दमदार पुनरागमन करत विजय मिळवला. पहिल्या फेरीच्या अखेरीस अंकुश १-४ असा पिछाडीवर होता. मात्र, अचूक पंच लगावत त्याने चुरशीच्या लढतीत दुसरी फेरी ३-२ अशी जिंकली.
तिसऱ्या फेरीतही भारतीय बॉक्सर दोन्ही खेळाडूंमध्ये सरस ठरला. अंकुशने ही फेरी ५-० अशी जिंकली. पाचपैकी चार पंचांनी अंकुशच्या बाजूने निर्णय दिला आणि त्याने ४-१ असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. चार पंचांनी २९-२८ असा अंकुशच्या बाजूने निर्णय दिला, तर एका पंचाने २८-२९ असा एर्किनबोवच्या बाजूने निर्णय दिला.
नरेंद्रचे कांस्यपदकावर समाधान
दरम्यान, भारताचा नरेंद्र याला उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या ओरलबे याच्याकडून ०-५ असा एकमताने पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे नरेंद्रला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ओरलबेने सुरुवातीपासूनच आपल्या दमदार पंचांच्या जोरावर लढतीवर वर्चस्व राखले. नरेंद्रने चांगली झुंज दिली, मात्र जागतिक विजेत्या बॉक्सरला पराभूत करण्यात त्याला यश आले नाही.
ओरलबेने पहिली फेरी ५-० अशी जिंकली. दुसऱ्या फेरीतही त्याने आपले वर्चस्व कायम ठेवले. त्याच्या जोरदार आक्रमणामुळे नरेंद्र अडचणीत आला. तिसऱ्या फेरीत कझाकिस्तानच्या बॉक्सरने बचावात्मक पवित्रा स्वीकारला आणि ही फेरीही ५-० अशी जिंकत लढत आपल्या नावावर केली.
हे ही वाचा:
शॉटगनमध्ये नीरू धांडाने दिले भारताला पाचवे सुवर्णपदक
चारधाम यात्रेला विक्रमी गर्दी; भाविकसंख्या ५३ लाखांवर
बंडखोरांच्या भागात म्यानमार लष्कराचा हवाई हल्ला
अमेरिकेत भारतीय उद्योगसमूह एस्सारचा ‘पोलादी’ विस्तार
अंकुशची ऐतिहासिक कामगिरी
अंकुश पंघाल हा २०१८ च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत अमित पंघालने ४९ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकल्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय पुरुष बॉक्सर ठरला आहे. अंकुशच्या अंतिम फेरीतील प्रवेशामुळे यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील बॉक्सिंगमध्ये भारताचे दुसरे रौप्यपदक निश्चित झाले आहे.
यापूर्वी भारताच्या परवीन हुड्डा हिने चीनच्या ली शू हिचा ५-० असा पराभव करत महिलांच्या ६५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सुवर्णपदकासाठी परवीनचा सामना चीनी तैपेईच्या चेन निएन-चिन हिच्याशी होणार आहे. या कामगिरीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतील बॉक्सिंगमध्ये भारताच्या पदकांच्या अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत.
