घरस्पोर्ट्सधोनी सीएसके संघाची खरी ओळख!

धोनी सीएसके संघाची खरी ओळख!

भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हे चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाची खरी ओळख असून, फ्रँचायझी त्यांना कधीही स्वतःपासून दूर जाऊ देणार नाही, असे मत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याने व्यक्त केले आहे. आयपीएलमधून निवृत्त झाल्यानंतर धोनी यांची मेंटर म्हणून भूमिका निश्चित करण्याच्या सीएसकेच्या निर्णयाचे त्याने कौतुक केले.

आयएएनएसशी बोलताना कनेरिया म्हणाला की, जगभरात सीएसकेची जी ओळख निर्माण झाली आहे, त्यामागे धोनी यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी भारताला अनेक मोठे विजय मिळवून दिले आणि आयसीसी स्पर्धांमध्येही यश मिळवले. त्यामुळे धोनी यांना मेंटर बनवण्याचा सीएसकेचा निर्णय अतिशय योग्य आहे. धोनी खेळणार नसले तरी फ्रँचायझी त्यांना संघासोबतच ठेवेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.

धोनी यांचा अनुभव सीएसकेसाठी फायदेशीर ठरेल, असे कनेरियाने सांगितले. २००८ मधील पहिल्या हंगामापासून धोनी या संघाशी जोडलेले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सीएसकेने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. संघाची कार्यपद्धती, खेळाडूंची क्षमता आणि त्यांना योग्य मार्गदर्शन कसे करायचे, याची धोनी यांना चांगली जाण आहे.

धोनी यांच्या रणनीतीचे कौतुक करताना कनेरियाने २००७ च्या टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान यांच्यातील बॉल आऊटची आठवण सांगितली. या सामन्यात धोनीने नियमित गोलंदाजांऐवजी वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग आणि रॉबिन उथप्पा यांच्यासारख्या खेळाडूंचा वापर केला होता. भारतीय गोलंदाजांनी अचूक स्टम्पवर चेंडू मारले आणि भारताने हा बॉल आऊट जिंकला. धोनीच्या कल्पक रणनीतीचे हे उत्तम उदाहरण असल्याचे कनेरिया म्हणाला.

धोनी यांच्यासारखा अनुभवी खेळाडू मेंटर म्हणून युवा क्रिकेटपटूंसाठी उपयुक्त ठरेल. पहिल्या वर्षी काही अडचणी येऊ शकतात; मात्र दुसऱ्या हंगामापासून त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील, असा विश्वासही कनेरियाने व्यक्त केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version