घरस्पोर्ट्समॅक्सवेलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा!

मॅक्सवेलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा!

ऑस्ट्रेलियाचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली आहे. सोमवारी रात्री त्याने हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे त्याच्या तब्बल १४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा अखेर पडदा पडला आहे. मात्र, जगभरातील विविध टी-२० लीगमध्ये खेळणे तो सुरू ठेवणार आहे.

३८ वर्षीय मॅक्सवेलने २५ ऑगस्ट २०१२ रोजी अफगाणिस्तानविरुद्ध शारजाह येथे वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये पाकिस्तानविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये, तर मार्च २०१३ मध्ये भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

उजव्या हाताने आक्रमक फलंदाजी आणि ऑफस्पिन गोलंदाजी करणाऱ्या मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियासाठी सात कसोटी सामने खेळले. यात एका शतकासह ३३९ धावा आणि आठ विकेट्स त्याने मिळवल्या. मात्र, त्याची खरी छाप वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये उमटली.

मॅक्सवेलने १४९ वनडे सामन्यांत चार शतके आणि २३ अर्धशतकांसह ३ हजार ९९० धावा केल्या. नाबाद २०१ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. याशिवाय त्याने ७७ विकेट्सही घेतल्या. ४ मार्च २०२५ रोजी भारताविरुद्ध त्याने अखेरचा वनडे सामना खेळला.

टी-२० क्रिकेटमध्येही मॅक्सवेलची कामगिरी प्रभावी राहिली. १३० सामन्यांत पाच शतके आणि १२ अर्धशतकांसह त्याने २ हजार ८९७ धावा केल्या. तसेच ५१ विकेट्स मिळवल्या. २० फेब्रुवारी २०२६ रोजी त्याने अखेरचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला.

अफगाणिस्तानविरुद्धची खेळी सुवर्णाक्षरांनी नोंदवली!

मॅक्सवेलच्या कारकिर्दीतील सर्वात अविस्मरणीय क्षण म्हणजे २०२३ च्या वनडे विश्वचषकातील अफगाणिस्तानविरुद्धची ऐतिहासिक खेळी. या सामन्यात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर २९२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाची अवस्था ९१ धावांत सात बाद अशी बिकट झाली होती. पराभव जवळपास निश्चित वाटत असतानाच मॅक्सवेलने अशक्यप्राय विजय खेचून आणला.

कर्णधार पॅट कमिन्सला साथीला घेत त्याने आठव्या विकेटसाठी नाबाद २०२ धावांची भागीदारी रचली. यात कमिन्सचे योगदान अवघ्या १२ धावांचे होते. मॅक्सवेलने १२८ चेंडूंत १० षटकार आणि २१ चौकारांच्या मदतीने नाबाद २०१ धावांची ऐतिहासिक खेळी साकारली. पायाच्या दुखापतीने त्रस्त असतानाही त्याने मैदानावर झुंज देत ऑस्ट्रेलियाला ४६.५ षटकांत सात बाद २९३ धावांपर्यंत पोहोचवले आणि तीन विकेट्सनी विजय मिळवून दिला.

या खेळीदरम्यान अनेकदा वेदनांमुळे मैदानावर आडवे व्हावे लागलेल्या मॅक्सवेलने षटकार ठोकत द्विशतक पूर्ण केले होते. ऑस्ट्रेलियाकडून वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो एकमेव फलंदाज आहे. त्याची ही खेळी क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळींपैकी एक मानली जाते.

मॅक्सवेल २०१५ आणि २०२३ मध्ये वनडे विश्वचषक जिंकणाऱ्या, तसेच २०२१ मध्ये टी-२० विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा सदस्य होता. आक्रमक फलंदाजी, उपयुक्त गोलंदाजी आणि संकटसमयी सामना जिंकून देण्याची क्षमता यामुळे त्याने क्रिकेटविश्वात वेगळी ओळख निर्माण केली. त्याच्या निवृत्तीनंतरही २०२३ मधील ती अविस्मरणीय खेळी चाहत्यांच्या कायम स्मरणात राहील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version