घरस्पोर्ट्सहार्दिकच्या पुनरागमनासाठी गिलची अट!

हार्दिकच्या पुनरागमनासाठी गिलची अट!

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. त्याच्या पुनरागमनाची भारतीय संघाला प्रतीक्षा असली, तरी थेट आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचा मार्ग मात्र सोपा नसणार आहे. टीम इंडियात पुनरागमन करण्यापूर्वी हार्दिकला देशांतर्गत क्रिकेट खेळून आपली तंदुरुस्ती सिद्ध करावी लागणार असल्याचे संकेत कर्णधार शुभमन गिल याने दिले आहेत.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला बुधवारपासून सुरुवात होत आहे. मात्र, दुखापतीमुळे हार्दिक या मालिकेत खेळणार नाही. त्याच्या अनुपस्थितीची भारतीय संघाला निश्चितच उणीव भासणार आहे.

मंगळवारी झालेल्या पूर्वसामना पत्रकार परिषदेत शुभमन गिलने हार्दिकच्या पुनरागमनाबाबत भूमिका स्पष्ट केली. तो म्हणाला, “आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघ हार्दिकच्या पुनरागमनाची प्रतीक्षा करत आहे. तो उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्यासारखी क्षमता जगातील मोजक्याच खेळाडूंमध्ये आहे. गोलंदाज म्हणून त्याचा विविध परिस्थितींमध्ये उपयोग करता येतो. नव्या आणि जुन्या चेंडूने गोलंदाजी करण्याची त्याच्यात क्षमता आहे.”

हार्दिकशी अनेकदा चर्चा झाल्याचे सांगत गिलने त्याच्या दुखापतींबाबतही चिंता व्यक्त केली. “दुखापतीच्या बाबतीत हार्दिक दुर्दैवी ठरला आहे. आयपीएलनंतर तो क्रिकेट खेळलेला नाही. मात्र, लवकरच तो मैदानात परतेल, अशी आशा आहे. पुनरागमनापूर्वी तो काही देशांतर्गत सामने खेळेल. त्यानंतर लवकरच त्याला भारतीय संघात पुन्हा पाहायला मिळेल,” असे गिलने सांगितले.

गिलच्या या वक्तव्यामुळे हार्दिकला भारतीय संघात पुनरागमन करण्यापूर्वी सय्यद मुश्ताक अली करंडक किंवा विजय हजारे करंडक यांसारख्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळावे लागण्याची शक्यता आहे. या स्पर्धांमधील कामगिरी आणि तंदुरुस्तीच्या आधारे त्याच्या पुनरागमनाचा मार्ग निश्चित होऊ शकतो.

हार्दिक पंड्या अखेरचा २४ मे २०२६ रोजी मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये खेळताना दिसला होता. सध्या तो दुखापतीतून सावरण्यासाठी बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये सराव आणि पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करत आहे. दुखापतीमुळे त्याला इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या मालिकांनाही मुकावे लागले आहे. आता देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी त्याला सेंटर ऑफ एक्सलन्सकडून तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र मिळते का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version