न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली. बे ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात भारताने डावाच्या पहिल्याच षटकात तीन प्रमुख फलंदाज गमावले. विशेष म्हणजे रोहित शर्मा, विराट कोहली आणि कर्णधार श्रेयस अय्यर या तिघांनाही खाते उघडता आले नाही. भारतीय एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच संघाने एकही धाव न करता सुरुवातीचे तीन फलंदाज गमावण्याची नामुष्की ओढवली.
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने पहिल्याच षटकात भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले. षटकाच्या सुरुवातीला रोहित शर्माने फिन अॅलनकडे झेल दिला. त्यानंतर विराट कोहलीला हेन्रीने त्रिफळाचीत केले. षटकाच्या अखेरच्या चेंडूवर श्रेयस अय्यरला पायचीत पकडत हेन्रीने भारताला तिसरा धक्का दिला. अवघ्या एका षटकात तीन प्रमुख फलंदाज बाद झाल्याने भारतीय संघाची अवस्था बिकट झाली.
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात एखाद्या संघाने शून्य धावसंख्येवर तीन विकेट गमावण्याची ही केवळ पाचवी घटना ठरली. मात्र, भारतीय वनडे क्रिकेटमध्ये असा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. विशेष म्हणजे २०१० नंतर प्रथमच रोहित शर्मा आणि विराट कोहली एकाच एकदिवसीय सामन्यात शून्यावर बाद झाले. यापूर्वी २०१० मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात दोघेही खाते न उघडता माघारी परतले होते.
भारताची घसरगुंडी एवढ्यावरच थांबली नाही. ऋतुराज गायकवाडही अवघ्या पाच धावा करून बाद झाला. त्यामुळे भारताने पहिल्या चार विकेट अवघ्या दहा धावांच्या आत गमावल्या. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अशी वेळ दुसऱ्यांदाच आली. यापूर्वी १९८३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध भारताने सुरुवातीच्या चार विकेट दहा धावांच्या आत गमावल्या होत्या.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटकांत ३३३ धावा केल्या होत्या. विल यंगने १०८ चेंडूंत १२५ धावांची शतकी खेळी साकारली. टिम सायफर्टने ४८ चेंडूंत ५८, तर फिन अॅलनने ४१ धावा केल्या. कर्णधार मिचेल सँटनरनेही २४ धावांचे योगदान दिले. भारताकडून आकिब नबी, गुरनूर बरार आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
