घरस्पोर्ट्सऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ७ विकेट्सनी धूळ चारली!

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ७ विकेट्सनी धूळ चारली!

युवा वेगवान गोलंदाज महली बिअर्डमनच्या पदार्पणातील अविस्मरणीय कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा सात विकेट्सनी पराभव केला. पर्थ स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बिअर्डमनने अवघ्या २४ धावा देत सहा विकेट्स मिळवल्या. इंग्लंडचा डाव १३१ धावांत गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियाने विजयासाठीचे १३२ धावांचे लक्ष्य अवघ्या २३.३ षटकांत तीन विकेट्स गमावून पूर्ण केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. ट्रॅव्हिस हेड खातेही न उघडता माघारी परतला. मात्र, त्यानंतर कर्णधार मिचेल मार्श आणि कूपर कोनोली यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४४ चेंडूंत ६१ धावांची भागीदारी करत संघाला सावरले. कोनोलीने ३० चेंडूंत २७ धावा केल्या. मार्शने मात्र आक्रमक फलंदाजी करत अवघ्या ३० चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ५० धावांची अर्धशतकी खेळी साकारली. जोश इंग्लिसने नाबाद २३, तर मॅट रेनशॉने नाबाद २६ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडची सुरुवात अडखळत झाली. बेन डकेट नऊ, जो रूट १७, तर कर्णधार हॅरी ब्रूक अवघ्या एका धावेवर बाद झाला. जॉर्डन कॉक्सला केवळ दोन धावा करता आल्या. टॉम बँटनने २५ धावा केल्या. विल जॅक्सने २५ धावांचे योगदान दिले, तर गस अ‍ॅटकिंसनने नाबाद २९ धावा करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडचा संपूर्ण संघ ३३.४ षटकांत १३१ धावांवर बाद झाला.

ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणाऱ्या महली बिअर्डमनने आपल्या पहिल्याच वनडे सामन्यात गोलंदाजीचा जलवा दाखवला. त्याने ७.४ षटकांत २४ धावा देत सहा फलंदाजांना माघारी धाडले. स्पेन्सर जॉन्सनने तीन विकेट्स घेत त्याला उत्तम साथ दिली. पदार्पणात सहा विकेट्स घेणाऱ्या बिअर्डमनच्या कामगिरीची या विजयात निर्णायक भूमिका ठरली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version