न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने तिसऱ्या दिवसअखेर सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. भारताने पहिल्या डावात ४ गडी गमावून ४८६ धावा केल्या असून, न्यूझीलंडवर ११८ धावांची आघाडी घेतली आहे. केएल राहुलच्या शानदार शतकानंतर कर्णधार शुभमन गिलनेही दमदार खेळी केली. मात्र, शतकापासून तो अवघ्या दोन धावांनी दूर राहिला.
तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारताने १ बाद १५९ धावांपासून केली. केएल राहुल आणि देवदत्त पडिक्कल यांनी संयमी फलंदाजी करत दुसऱ्या विकेटसाठी १६५ धावांची भागीदारी केली. पडिक्कलने १७५ चेंडूंचा सामना करत ८० धावा केल्या. मात्र, शतक पूर्ण करण्यात त्याला अपयश आले. काइल जेमिसनने त्याला त्रिफळाचीत केले.
यानंतर राहुलने कसोटी कारकिर्दीतील १३ वे शतक पूर्ण केले. त्याने २९० चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १३६ धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांमध्ये कसोटी शतक झळकावणारा तो भारताचा पहिला सलामीवीर ठरला. बाद होण्यापूर्वी त्याने शुभमन गिलसोबत तिसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली.
राहुल बाद झाल्यानंतर गिल आणि ऋषभ पंत यांनी भारतीय डावाला आकार दिला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. गिल शतकाच्या दिशेने वाटचाल करत असताना जेकब डफीने त्याला ९८ धावांवर त्रिफळाचीत केले. गिलने १४६ चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकार लगावले.
दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऋषभ पंत ६२ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांसह ५५ धावांवर नाबाद होता. त्याच्यासोबत अंशुल कंबोज खेळत होता. त्याला अद्याप खाते उघडता आले नव्हते.
यापूर्वी न्यूझीलंडने हेन्री निकोल्सच्या नाबाद १७५ आणि ग्लेन फिलिप्सच्या ११८ धावांच्या जोरावर पहिल्या डावात ३६८ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताने ११८ धावांची आघाडी घेत सामन्यात आपले पारडे जड केले आहे.
