इन्स्टाग्रामवर दोन वरिष्ठ नेत्यांची खाती प्रतिबंधित केल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हैदराबादमधील मेटा कंपनीच्या कार्यालयात धडक देत गोंधळ घातला. शुक्रवारी (२० नोव्हेंबर) झालेल्या या आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या परिसरातील फुलदाण्या फोडून मालमत्तेचे नुकसान केले. तेलंगणा युवक काँग्रेसचे अध्यक्ष जक्किडी शिवचरण रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या घटनेचे व्हिडीओ युवक काँग्रेसने सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहेत.
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब आणि राष्ट्रीय प्रभारी मनीष शर्मा यांच्या इन्स्टाग्राम खात्यांवर मेटाने निर्बंध घातल्याचा आरोप संघटनेने केला आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दबावाखाली मेटा विरोधी पक्षांचा आवाज दाबत असल्याचा दावा आंदोलकांनी केला. मात्र, मेटाकडून या आरोपांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी कार्यालय परिसरात घोषणाबाजी केली. पोलिसांनी हस्तक्षेप करत शिवचरण रेड्डी यांच्यासह सुमारे २० कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत ताब्यात घेतले. काही तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी मेटाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली नसल्याचे सांगण्यात आले.
हे ही वाचा:
सरकारी पोर्टल हॅक करून अग्निवीरांचा डेटा डार्क वेबवर विक्रीसाठी
कॅलिफोर्नियात ३६ मालगाड्यांची लूट करत २०० कोटींचा माल लंपास
हाँगकाँग, नॅस्डॅकपेक्षा एनएसई वरचढ
परदेशी असूनही सोनिया गांधी मारुतीच्या ५० टक्के मालक कशा?
दरम्यान, युवक काँग्रेसने मेटाला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या काळात संबंधित खात्यांवरील निर्बंध हटवले नाहीत, तर देशभरातील मेटा कार्यालयांबाहेर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला. आंदोलनानंतर दोन्ही नेत्यांची खाती पुन्हा सुरू झाल्याचा दावाही संघटनेने केला आहे. हैदराबादप्रमाणेच मुंबई आणि गुरुग्राममध्येही युवक काँग्रेसने मेटाच्या कार्यालयांबाहेर निदर्शने केली.
