अमेरिकेत मालवाहू रेल्वेगाड्या लुटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, या चोरट्यांनी रेल्वेगाड्यांमधून माल चोरतानाचे व्हिडीओ स्वतःच चित्रित केले होते. दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये तब्बल दोन वर्षे सुरू असलेल्या या चोरीच्या साखळीतून त्यांनी २२.५ दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे २०८ कोटी रुपयांचा माल लंपास केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी २१ वर्षीय तरुणासह एकूण १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या माहितीनुसार, चोरीचे व्हिडीओ, छायाचित्रे आणि ग्रुप चॅटमधील संदेश तपासासाठी महत्त्वाचे ठरले.
फेब्रुवारी २०२४ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत ही टोळी सक्रिय होती. त्यांनी दक्षिण कॅलिफोर्नियातील पिको रिवेरा आणि फुलर्टन यांसारख्या भागांतील रेल्वेमार्गांवरून जाणाऱ्या मालगाड्यांना लक्ष्य केले. लॉस एंजेलिस आणि लॉंग बीच बंदरांमार्गे अमेरिकेत आलेला माल रेल्वेने देशाच्या विविध भागांत पाठवला जात होता. याच मालगाड्यांमधील महागड्या वस्तू चोरण्याची योजना टोळीने आखली होती.
चोरीसाठी आरोपी ट्रक आणि व्हॅनमधून रेल्वेमार्गांजवळ पोहोचत असत. त्यानंतर काही जण धावत्या मालगाड्यांवर चढून ब्रेकची एअर होज किंवा संबंधित नळ्या कापत असत. त्यामुळे गाडीला आपत्कालीन थांबा घ्यावा लागत असे. गाडी थांबल्यानंतर डब्यांमधील माल बाहेर काढून तो जवळ उभ्या असलेल्या वाहनांमध्ये भरला जात असे. हा माल सुरक्षित ठिकाणी नेऊन नंतर काळ्या बाजारात विकला जात होता.
हे ही वाचा:
हाँगकाँग, नॅस्डॅकपेक्षा एनएसई वरचढ
परदेशी असूनही सोनिया गांधी मारुतीच्या ५० टक्के मालक कशा?
पन्नू हत्या कटप्रकरणी निखिल गुप्ताला १९ वर्षांचा तुरुंगवास
घाटकोपरमध्ये सात बांगलादेशी घुसखोरांना अटक
या टोळीने नायकीचे महागडे शूज, इलेक्ट्रॉनिक वस्तू, पॉवर टूल्स आणि इतर ग्राहक उपयोगाच्या वस्तू चोरल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, चोरीदरम्यान आरोपी व्हिडीओ चित्रित करत असत. काही जण चोरी केलेल्या मालासह फोटो काढत, तर काही जण चोरीच्या घटनांचे तपशील ग्रुप चॅटमध्ये शेअर करत होते. या प्रकरणातील सर्वात तरुण आरोपी २१ वर्षीय नाथन डॅनियल एंजेल असून, तो पूर्व लॉस एंजेलिसचा रहिवासी आहे. त्याच्यावर या टोळीचे नेतृत्व केल्याचा आरोप आहे. उर्वरित १३ आरोपींचे वय २३ ते ३८ वर्षांदरम्यान आहे. सर्व १४ जणांवर कट रचणे आणि रेल्वेने वाहतूक होणाऱ्या मालाची चोरी केल्यासह विविध आरोप ठेवण्यात आले आहेत.
