घरस्पोर्ट्सपुष्पेंद्र गर्ग यांची एकट्याने जगप्रदक्षिणा

पुष्पेंद्र गर्ग यांची एकट्याने जगप्रदक्षिणा

धाडस, जिद्द आणि साहसाच्या जोरावर सातासमुद्रापार भारताचा तिरंगा उंचावणारे पुष्पेंद्र कुमार गर्ग हे देशातील पहिले एकल नौकायात्री म्हणून ओळखले जातात. अवघ्या ५६ फूट लांबीच्या ‘करुणा’ या नौकेतून त्यांनी एकट्याने संपूर्ण जगाची समुद्रमार्गे सफर पूर्ण केली. त्यांच्या या साहसी कामगिरीने भारतीय नौकायन क्षेत्राला जागतिक ओळख मिळवून दिली.

पुष्पेंद्र कुमार गर्ग यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९६३ रोजी उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झाला. १९८४ मध्ये भारतीय नौदलात अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर १९८५ मध्ये त्यांना पहिल्यांदा जागतिक समुद्रप्रदक्षिणेची संधी मिळाली. सहा नौसैनिकांच्या पथकासोबत त्यांनी १५ हजार नॉटिकल मैलांचा प्रवास केला. ही मोहीम तब्बल १४ महिने चालली. या अनुभवाने त्यांच्या मनात एकट्याने जगप्रदक्षिणा करण्याची जिद्द निर्माण केली.

वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी २०१४ मध्ये मुंबईतून ‘करुणा’ या ५६ फूट लांबीच्या नौकेतून एकट्याने समुद्रप्रवासाला सुरुवात केली. दक्षिणेकडील तीन अत्यंत धोकादायक सागरी टोकांमधून म्हणजेच केप ऑफ गुड होप, केप ल्यूविन आणि केप हॉर्न मार्गे त्यांनी ही मोहीम पूर्ण केली. या मार्गाला ‘थ्री ग्रेट केप्स’ मार्ग म्हणून ओळखले जाते.

४ ऑगस्ट २०१४ रोजी सुरू झालेली ही मोहीम २८ मार्च २०१५ रोजी पूर्ण झाली. तब्बल ३० हजार ३७४ नॉटिकल मैल म्हणजेच सुमारे ५६ हजार २५० किलोमीटरचा प्रवास त्यांनी अवघ्या २३७ दिवसांत पूर्ण केला. हा पराक्रम करणारे ते आशियातील पहिले नौकायात्री ठरले.

केवळ समुद्रप्रवासच नव्हे, तर नौकायन स्पर्धांमध्येही गर्ग यांनी भारताचा लौकिक वाढवला. १९९३ मध्ये झिम्बाब्वे येथे झालेल्या एंटरप्राइज क्लास जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकावले. तर १९९७ मध्ये गोव्यात झालेल्या याच स्पर्धेत रौप्यपदक जिंकले.

भारतीय नौदलातील लेफ्टनंट कमांडर पदावरून निवृत्त झालेल्या पुष्पेंद्र कुमार गर्ग यांना त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी अर्जुन पुरस्कार आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत समुद्राच्या अथांग विश्वात भारताचा झेंडा रोवणारा हा साहसी प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version