अमेरिकेची तपास यंत्रणा फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (एफबीआय) सतिंदरजीत सिंह ऊर्फ गोल्डी ब्रार याचा अमेरिकेतील दहा सर्वाधिक वाँटेड फरार गुन्हेगारांच्या यादीत समावेश केला आहे. त्याला पकडण्यासाठी एफबीआयने १० लाख डॉलर म्हणजेच सुमारे ९ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
एफबीआयने गोल्डी ब्रार याला लॉरेन्स बिश्नोईच्या संघटित गुन्हेगारी टोळीचा उत्तर अमेरिकेतील कथित प्रमुख म्हटले आहे. या टोळीवर अमेरिका आणि कॅनडामध्ये हत्या, गोळीबार, अपहरण, खंडणी, मारहाण, मानवी तस्करी तसेच अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी केल्याचे आरोप आहेत. राजकीय आणि धार्मिक व्यक्तींच्या हत्यांमध्येही या टोळीचा सहभाग असल्याचा दावा अमेरिकी यंत्रणेने केला आहे.
एफबीआयच्या लॉस एंजेलिस कार्यालयाचे सहायक संचालक पॅट्रिक ग्रँडी यांनी सांगितले की, गोल्डी ब्रारवरील गंभीर गुन्ह्यांचे आरोप आणि त्याची हिंसक पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्याचा मोस्ट वाँटेड यादीत समावेश करण्यात आला आहे. त्याला पकडून अमेरिकी न्यायालयात खटला चालवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा:
संविधानाचे पुस्तक दाखवणाऱ्या काँग्रेसची ‘मेटा’ कार्यालयात तोडफोड
सरकारी पोर्टल हॅक करून अग्निवीरांचा डेटा डार्क वेबवर विक्रीसाठी
कॅलिफोर्नियात ३६ मालगाड्यांची लूट करत २०० कोटींचा माल लंपास
हाँगकाँग, नॅस्डॅकपेक्षा एनएसई वरचढ
एफबीआयच्या माहितीनुसार, १ जुलै रोजी लॉस एंजेलिसमधील अमेरिकी जिल्हा न्यायालयाने गोल्डी ब्रारविरोधात संघीय अटक वॉरंट जारी केले. त्याच्यावर कट रचणे, खंडणीद्वारे व्यवसायात अडथळा आणणे आणि अमली पदार्थांच्या वितरणासंबंधी कट रचल्याचे आरोप आहेत.
