घरस्पोर्ट्स‘खेलो इंडिया संवाद’चा मोदींशी महासंवाद

‘खेलो इंडिया संवाद’चा मोदींशी महासंवाद

राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने २७ ऑगस्ट रोजी देशभरात ‘खेलो इंडिया संवाद – खेल की बात, प्रधानमंत्री के साथ’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या देशव्यापी उपक्रमाच्या माध्यमातून देशातील १,५०० हून अधिक ठिकाणी तरुण, खेळाडू आणि शैक्षणिक संस्थांना एकत्र आणले जाणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील युवा शक्तीला संबोधित करणार आहेत.

या कार्यक्रमात देशातील नामांकित क्रीडा क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वेही तरुणांशी थेट संवाद साधणार आहेत. आयआयटी, आयआयएम, एनआयटी, एम्स, प्रमुख वैद्यकीय महाविद्यालये तसेच विविध विद्यापीठे आणि मोठ्या शैक्षणिक संस्थांचा या देशव्यापी मोहिमेत सहभाग राहणार आहे. तरुण आणि देशातील धोरणकर्ते यांच्यात थेट संवाद घडवून आणणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

खेळाच्या विकासासाठी तरुणांकडून सूचना

या संवादाच्या माध्यमातून तरुणांना आपले अनुभव, कल्पना, सूचना आणि नवीन संकल्पना धोरणकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळणार आहे. यासाठी चार प्रमुख विषय निश्चित करण्यात आले आहेत.

पहिला विषय म्हणजे जमीनी पातळीवर क्रीडा सुविधा, प्रशिक्षण आणि संधी उपलब्ध करून देत देशातील क्रीडा व्यवस्था अधिक मजबूत करणे.

दुसरा विषय वैज्ञानिक पद्धतीने क्रीडा प्रतिभेचा शोध घेणे आणि खेळाडूंच्या विकासावर भर देणे, हा आहे. २०३६ च्या ऑलिम्पिकसाठी भारतातील प्रतिभावान खेळाडूंना तयार करण्याच्या दृष्टीने यावर विशेष चर्चा होणार आहे.

तिसऱ्या विषयात युवा नेतृत्वाला प्रोत्साहन देणे आणि शासन-प्रशासनातील तरुणांचा सहभाग वाढवणे, यावर विचारमंथन केले जाणार आहे.

तर चौथा विषय ‘विकसित भारत’ घडवण्यासाठी तरुणांचे सक्षमीकरण हा आहे. भविष्यात आवश्यक असलेली कौशल्ये, स्वयंसेवा आणि राष्ट्रनिर्मितीच्या विविध संधी यावर तरुणांकडून सूचना घेतल्या जातील.

मोदींच्या संबोधनानंतर देशभरात संवाद

कार्यक्रमाची सुरुवात ‘माय भारत’च्या स्वयंसेवकांच्या स्वागतपर भाषणाने होणार आहे. त्यानंतर मागील १२ वर्षांत भारताच्या क्रीडा क्षेत्रात झालेल्या महत्त्वपूर्ण बदलांचा आढावा घेणारा विशेष व्हिडिओ दाखवण्यात येईल. तसेच क्रीडा आणि युवा शक्तीबाबत पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मांडलेल्या प्रमुख मुद्द्यांचे सादरीकरण केले जाणार आहे.

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हर्च्युअल संबोधन होईल. पंतप्रधानांच्या संबोधनानंतर देशभरातील १,५०० हून अधिक ठिकाणी स्थानिक कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे.

दिग्गज खेळाडू तरुणांशी साधणार संवाद

या कार्यक्रमात भारतातील अनेक दिग्गज खेळाडू आणि पदकविजेते सहभागी होणार आहेत. मनिका बत्रा, दीपा कर्माकर, सायना नेहवाल, गगन नारंग, श्रीजेश, मेरी कोम, बायचुंग भूतिया, पुलेला गोपीचंद, अंजू बॉबी जॉर्ज, कर्णम मल्लेश्वरी, मीराबाई चानू आणि पी. टी. उषा यांच्यासह क्रिकेट क्षेत्रातील नामवंत खेळाडू तरुणांशी थेट संवाद साधणार आहेत.

हे खेळाडू आपल्या क्रीडा प्रवासातील संघर्ष, आव्हाने, अपयश, यश आणि अनुभव तरुणांसोबत शेअर करतील. मोठा चॅम्पियन होण्याचा प्रवास एखाद्या भव्य स्टेडियमपासून नव्हे, तर छोट्या मैदानावरच्या पहिल्या प्रयत्नापासून सुरू होतो, हा विश्वास तरुणांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

मंत्री आणि लोकप्रतिनिधीही सहभागी

या उपक्रमात खासदार, आमदार, केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री तसेच विविध राज्यांचे क्रीडामंत्री सहभागी होणार आहेत. हे लोकप्रतिनिधी आणि मान्यवर तरुणांशी संवाद साधून चार प्रमुख विषयांवर त्यांचे विचार आणि सूचना जाणून घेणार आहेत.

दरम्यान, या कार्यक्रमांतर्गत ‘विकसित भारत युवा लीडर संवाद’ क्विझ देखील आयोजित केली जाणार आहे. तरुणांना ‘माय भारत’ पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.

या उपक्रमाचा उद्देश केवळ एका दिवसापुरता युवा सहभाग मर्यादित न ठेवता, तरुणांना दीर्घकाळ चालणाऱ्या राष्ट्रीय युवा सहभागाच्या व्यवस्थेशी जोडणे हा आहे. देशाच्या क्रीडा धोरणात जमीनीवरील अनुभव आणि तरुणांच्या अपेक्षा थेट पोहोचवण्याच्या दृष्टीने ‘खेलो इंडिया संवाद’ हा महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version