भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारत आणि रशियामधील द्विपक्षीय व्यापार वाढण्यासाठी विशेष लक्ष असल्याचे मत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी व्यक्त केले आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या मॉस्को दौऱ्यात पुतिन यांनी भारत-रशिया संबंधांबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले.
पुतिन यांनी भारत आणि रशियामधील व्यापारातील वाढीचे स्वागत करताना, पंतप्रधान मोदी भारत-रशिया संबंध अधिक मजबूत करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर लक्ष देत असल्याचे सांगितले. पुतिन म्हणाले की, मागील वर्षी भारत-रशिया व्यापारात काहीशी घट झाली होती. मात्र, यावर्षी व्यापार पुन्हा वाढत आहे.
भारत-रशिया संबंधांमधील वाढीचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाते, असे पुतिन यांनी नमूद केले. भारत आणि रशियामधील सहकार्य केवळ सरकारच्या पातळीपुरते मर्यादित नसून संसद, अर्थव्यवस्था आणि विविध संस्थांमध्येही व्यापक सहकार्य सुरू असल्याचे पुतिन यांनी सांगितले.
हे ही वाचा:
यशस्वी-असिथा मैदानात भिडले; दंड बसला!
अहमदाबाद–मंगळुरू ट्रेनला पालघरचा थांबा
अमृत भारत’ एक्सप्रेस आता नियमित धावणार!
तमिळनाडूत तीन मोफत गॅस सिलिंडर; महिला, तृतीयपंथीयांसाठी मोफत बस प्रवास
पुतिन यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देण्यास सांगितले. मोदी यांची लवकरच भेट होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांची भेट होण्याची शक्यता असल्याचे पुतिन यांनी सांगितले. याशिवाय, यावर्षी दोन्ही नेत्यांची आणखी एक भेट होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी संकेत दिले.
भारताच्या कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाच्या असलेल्या खतांच्या पुरवठ्याबाबतही पुतिन यांनी आश्वासन दिले. भारताला खतांचा पुरवठा वाढवण्यासाठी रशिया प्रयत्नशील असून, भारतीय शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन भविष्यातही पुरवठा वाढवण्यास रशिया तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारत-रशिया चर्चेतील ऊर्जा आणि खतांचा पुरवठा हे महत्त्वाचे मुद्दे असल्याचे पुतिन यांनी नमूद केले.
भारत आणि रशियामधील सहकार्य आता पारंपरिक संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्राच्या पलीकडे विस्तारत असल्याचे पुतिन यांनी सांगितले. दोन्ही देशांमध्ये अणुऊर्जा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि इतर उच्च-तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा सुरू आहे. या क्षेत्रांमध्ये सातत्याने प्रगती होत असल्याचेही रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या मॉस्को भेटीच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.
