घरस्पोर्ट्स‘नो हँडशेक’वर एमसीसीचे हात बांधलेले!

‘नो हँडशेक’वर एमसीसीचे हात बांधलेले!

क्रिकेटमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यांदरम्यान चर्चेचा विषय ठरलेल्या ‘नो हँडशेक’ प्रकरणावर मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. खेळाडूंनी एकमेकांशी हात मिळवावेत आणि क्रिकेटमधील खिलाडूवृत्ती जपावी, अशी एमसीसीची इच्छा असली तरी राजकीय आणि भू-राजकीय परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे आपल्या अधिकारक्षेत्रात नसल्याचे क्लबने मान्य केले आहे.

एमसीसीचे क्रिकेटप्रमुख फ्रेझर स्टीवर्ट यांनी शारजाह येथे आयएलटी२० स्पर्धेदरम्यान ही भूमिका मांडली. क्रिकेटमधील खेळभावना जपण्यासाठी खेळाडूंनी एकमेकांचा आदर करणे महत्त्वाचे आहे. मात्र, काही परिस्थिती क्रिकेटच्या पलीकडच्या असतात. भू-राजकीय मुद्द्यांवर हस्तक्षेप करणे आपल्या अधिकारात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये पारंपरिक हस्तांदोलन टाळण्याचे प्रकार वाढले आहेत. टॉसच्या वेळी तसेच सामना संपल्यानंतरही दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी हात मिळवताना दिसत नाहीत. पुरुष, महिला आणि विविध वयोगटांतील सामन्यांमध्येही हीच परिस्थिती पाहायला मिळाली आहे. रविवारी दोहा येथे झालेल्या भारत-अ आणि पाकिस्तान-अ यांच्यातील एसीसी मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेतील सामन्यातही हस्तांदोलन झाले नाही.

स्टीवर्ट म्हणाले, की खेळाडूंनी एकमेकांचा, पंचांचा आणि त्यांच्या निर्णयांचा आदर करावा, तसेच क्रिकेटचा सन्मान राखावा, एवढ्याच गोष्टी एमसीसीच्या नियंत्रणात आहेत. मैदानावर घडणाऱ्या घटनांवर क्लब लक्ष ठेवू शकतो; मात्र राजकीय किंवा उच्चस्तरीय आदेशांमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही.

खेळाडूंना वरिष्ठ स्तरावरून हस्तांदोलन न करण्याच्या सूचना दिल्या जात असतील, तर त्या बदलण्याचा अधिकार एमसीसीकडे नाही. खेळाडूंनी हात मिळवावेत, हीच आमची अपेक्षा आहे. मात्र, त्यामागे असलेले मोठे मुद्दे आमच्या नियंत्रणाबाहेर आहेत, असेही स्टीवर्ट यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version