घरस्पोर्ट्स'सब्र'चा बांध फुटला; सँडपेपर वाद पुन्हा उफाळला!

‘सब्र’चा बांध फुटला; सँडपेपर वाद पुन्हा उफाळला!

ऑस्ट्रेलियन क्रिकेटला हादरवून सोडणाऱ्या २०१८ मधील बॉल टॅम्परिंग अर्थात सँडपेपर प्रकरणाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज उस्मान ख्वाजा याने आपल्या ‘सब्र’ या पुस्तकातून या प्रकरणाबाबत धक्कादायक दावे केल्यानंतर क्रिकेटविश्वात नव्याने चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाचा टी-२० कर्णधार मिचेल मार्श याने या वादावर भाष्य करण्याचे टाळत आपण भूतकाळ मागे सोडल्याचे स्पष्ट केले.

ख्वाजाच्या दाव्यानुसार, २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यात झालेल्या चेंडू कुरतडण्याच्या कटाची माहिती केवळ शिक्षा झालेल्या तीन खेळाडूंपुरती मर्यादित नव्हती, तर संघातील इतर काही सदस्यांनाही याची माहिती होती. या खुलाशामुळे ऑस्ट्रेलियन संघातील अन्य खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना मार्श म्हणाला, “काही जणांनी आपली बाजू मांडली आहे, त्याचा मी आदर करतो. मात्र, मी येथे माझ्या जुन्या आठवणी सांगण्यासाठी आलेलो नाही. सध्या आमच्यासाठी महत्त्वाचा आठवडा असून, माझे संपूर्ण लक्ष आगामी सामन्याच्या तयारीवर आहे. मी त्या घटनांमधून पुढे गेलो आहे.”

पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वी ख्वाजा आणि आपल्यामध्ये खासगी फोनवर चर्चा झाल्याचेही मार्शने मान्य केले. या चर्चेत ख्वाजाचे दावे आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केलेल्या चौकशीचाही विषय होता. मात्र, याबाबत अधिक माहिती देण्यास त्याने नकार दिला.

दरम्यान, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि नॅथन लायन यांनी सँडपेपर प्रकरणाची पूर्वकल्पना नसल्याचे स्पष्ट करणाऱ्या निवेदनावर स्वाक्षरी केली होती. मात्र, मार्शने त्यावर स्वाक्षरी का केली नाही, या प्रश्नावरही त्याने मौन बाळगले.

२०१८ मधील या प्रकरणानंतर कॅमेरून बॅनक्रॉफ्ट, स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आता ख्वाजाच्या नव्या दाव्यांमुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील त्या जुन्या वादाला पुन्हा हवा मिळाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version