आपल्या अफलातून ड्रिब्लिंग, भन्नाट कौशल्य आणि जादुई खेळाने जगभरातील फुटबॉलप्रेमींना वेड लावणारा ब्राझीलचा महान फुटबॉलपटू रोनाल्डिन्हो तब्बल ११ वर्षांनंतर पुन्हा व्यावसायिक फुटबॉलच्या मैदानात उतरणार आहे. वयाच्या ४६व्या वर्षी तो इटलीच्या रेवेना एफसी क्लबकडून खेळताना दिसणार असून, १५ नोव्हेंबरला फोर्लीविरुद्धच्या सामन्यातून त्याच्या पुनरागमनाचा थरार अनुभवायला मिळणार आहे.
२०१५ मध्ये ब्राझीलच्या फ्लुमिनेन्स क्लबकडून अखेरचा व्यावसायिक सामना खेळल्यानंतर रोनाल्डिन्होने २०१८ मध्ये निवृत्ती जाहीर केली होती. आता खेळाडू आणि भागधारक अशा दुहेरी भूमिकेत तो रेवेना एफसीशी जोडला गेला आहे. त्याच्या पुनरागमनामुळे क्लबची लोकप्रियता वाढण्याची अपेक्षा आहे.
विशेष म्हणजे, रोनाल्डिन्होच्या नावावर व्यावसायिक कारकिर्दीत २९९ गोल आहेत. त्यामुळे आणखी एक गोल झळकावताच त्याला ३०० गोलांचा टप्पा गाठण्याची ऐतिहासिक संधी आहे. २००२ मध्ये विश्वचषक विजेत्या ब्राझील संघाचा सदस्य असलेल्या रोनाल्डिन्होने बार्सिलोनाकडून खेळताना दोन ला लीगा आणि एक चॅम्पियन्स लीग विजेतेपद पटकावले. २००५ मध्ये त्याने प्रतिष्ठेचा बॅलन डी’ओर पुरस्कारही जिंकला होता. फुटबॉलच्या मैदानावर पुन्हा एकदा त्याची जादू पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
