टाटा समूहात नेतृत्वाच्या पातळीवर मोठे बदल झाले आहेत. टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी वयाची ७० वर्षे पूर्ण केल्यानंतर समूहातील सहा महत्त्वाच्या कंपन्यांच्या संचालक मंडळातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा समूहाच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्स धोरणानुसार बिगर-कार्यकारी संचालकांसाठी निवृत्तीचे वय ७० वर्षे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार १२ नोव्हेंबर २०२६ पासून हे बदल लागू झाले आहेत. ट्रेंट, व्होल्टास, टाटा स्टील, टायटन, टाटा इंटरनॅशनल आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन या कंपन्यांच्या नेतृत्वात त्यामुळे महत्त्वपूर्ण फेरबदल होणार आहेत.
नोएल टाटा यांच्या निवृत्तीनंतर विविध कंपन्यांची जबाबदारी नव्या नेतृत्वाकडे सोपवण्यात आली आहे. टाटा स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक टी. व्ही. नरेंद्रन यांच्याकडे टाटा इंटरनॅशनलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. व्होल्टासच्या अध्यक्षपदी सुनील डिसोझा यांची नियुक्ती करण्यात आली असून, ट्रेंटच्या अध्यक्षपदाची जबाबदारी बहराम वकील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. याशिवाय इतर कंपन्यांमध्येही संचालक मंडळाच्या पातळीवर बदल करण्यात येत आहेत. या फेरबदलांमुळे टाटा समूहातील महत्त्वाच्या कंपन्यांच्या निर्णयप्रक्रियेत नव्या नेतृत्वाची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
मात्र, सहा कंपन्यांच्या संचालक मंडळातून बाहेर पडले तरी नोएल टाटा यांचा समूहातील प्रभाव कायम राहणार आहे. टाटा समूहाची प्रमुख होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्सच्या संचालक मंडळावर ते टाटा ट्रस्ट्सचे नामनिर्देशित संचालक म्हणून कार्यरत राहतील. तसेच टाटा सन्समध्ये सुमारे ६६ टक्के हिस्सा असलेल्या टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे कायम राहणार आहे. त्यामुळे समूहाच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची असेल.
हे ही वाचा:
दोन हजारांचे ऑनलाइन कर्ज काढणाऱ्या महिलेला ओढले जाळ्यात
दिवाळीत ई-कॉमर्स कंपन्यांची १.४० लाख कोटींची विक्रमी उलाढाल
प्रत्यक्ष कर संकलनातून सरकारी तिजोरीत १४.४२ लाख कोटींची भर
कॉन्स्टेबलने महिला सहकाऱ्याचा केला ३ वर्षे मानसिक छळ गुन्हा दाखल
दरम्यान, टाटा समूहात टाटा ट्रस्ट्स आणि टाटा सन्स यांच्यातील नेतृत्वविषयक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे बदल महत्त्वाचे मानले जात आहेत. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या मुदतवाढीच्या मुद्द्यावर नोएल टाटा यांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे या निवृत्तीमुळे समूहातील अंतर्गत समीकरणांबाबतही चर्चा सुरू झाली आहे. आता नव्या नेतृत्वाच्या हाती महत्त्वाच्या कंपन्यांची सूत्रे गेल्यानंतर टाटा समूहाच्या भविष्यातील व्यावसायिक रणनीतीत कोणते बदल होतात, याकडे उद्योगजगताचे लक्ष लागले आहे.
