घरक्राईमनामादोन हजारांचे ऑनलाइन कर्ज काढणाऱ्या महिलेला ओढले जाळ्यात

दोन हजारांचे ऑनलाइन कर्ज काढणाऱ्या महिलेला ओढले जाळ्यात

अश्लील फोटोंची धमकी देऊन उकळले हजारो रुपये

अवघ्या दोन हजार रुपयांचे ऑनलाइन कर्ज घेणे पवईतील एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. मुद्दल आणि व्याजाची पूर्ण परतफेड करूनही सायबर भामट्यांनी पीडित महिलेच्या बँक खात्यात जबरदस्तीने परस्पर पैसे जमा करून तिला कर्जाच्या विळख्यात ओढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

महिलेचे फोटो मॉर्फ करून अश्लील फोटो नातेवाइकांना पाठवण्याची धमकी देत आरोपींनी २० हजार रुपयांहून अधिक रक्कम उकळली. या प्रकरणी अखेर पवई पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असे अडकवले जाळ्यात

साकीविहार रोडवरील गौतमनगर परिसरात राहणाऱ्या तक्रारदार महिलेला १३ ऑक्टोबर रोजी एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने वैयक्तिक कर्जाची विचारणा केली असता, महिलेने दोन हजार रुपयांची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर तिला व्हॉट्सॲपवर ‘ट्रस्ट लोन ॲप’ची लिंक पाठवण्यात आली. कर्ज प्रक्रियेसाठी महिलेने नाव, बँक खात्याचा तपशील, ओळखीचा पुरावा आणि स्वतःचा फोटो अपलोड केला. अवघ्या अर्ध्या तासात महिलेच्या युनियन बँकेच्या खात्यात १,२०० रुपये जमा करण्यात आले.

हे ही वाचा:

प्रत्यक्ष कर संकलनातून सरकारी तिजोरीत १४.४२ लाख कोटींची भर

कॉन्स्टेबलने महिला सहकाऱ्याचा केला ३ वर्षे मानसिक छळ गुन्हा दाखल

लाभार्थी हिंदू, ताबा बांगलादेशींकडे? म्हाडाच्या ११० घरांवरून वाद

किश्तवाडमध्ये ड्युटीवरून बेपत्ता झालेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांची हत्या

परतफेडीनंतरही छळ सुरूच

महिलेने १६ ऑक्टोबरला कर्जाची परतफेड करण्याचा प्रयत्न केला, मात्र तांत्रिक अडचणी दाखवून ॲप बंद झाले. त्यानंतर १९ ऑक्टोबरला वसुलीसाठी धमक्यांचे फोन येऊ लागले. महिलेने दिलेल्या क्यूआर कोडवर पेटीएमद्वारे रक्कम भरली आणि तत्काळ ते ॲप फोनमधून डिलीट केले. मात्र, २६ ऑक्टोबरला अचानक महिलेच्या खात्यात २,२०० रुपये परस्पर जमा झाले. महिलेने यास विरोध दर्शवताच भामट्यांनी तिचे मॉर्फ केलेले आक्षेपार्ह फोटो नातेवाइकांना पाठवून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

‘दिवाळी खराब करू’ अशी धमकी

बदनामीच्या भीतीने महिलेने १ नोव्हेंबरला न घेतलेल्या कर्जापोटी ४,००० रुपये भरले. तरीही २ नोव्हेंबरला तिच्या खात्यात पुन्हा ३,३०० रुपये पाठवण्यात आले. ‘पैसे न दिल्यास दिवाळी खराब करू आणि मॉर्फ केलेले फोटो संपूर्ण कुटुंबाला पाठवू,’ अशी थेट धमकी ८ नोव्हेंबरला व्हॉट्सॲपवर देण्यात आली. प्रचंड मानसिक तणावाखाली आलेल्या महिलेने दोन टप्प्यांत ७,५०० रुपये पाठवले. तरीही त्याच रात्री पुन्हा खात्यात ३,३०० रुपये जमा झाल्याचे दिसताच महिलेने थेट पोलिसांकडे धाव घेतली. पवई पोलिसांनी या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यासह खंडणीचा गुन्हा नोंदवला असून, या सायबर टोळीचा शोध सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version