मुंबई पोलीस दलातील एका महिला पोलिसाचा मागील तीन वर्षांपासून सतत पाठलाग करून तिचा मानसिक आणि लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी एका पोलीस कॉन्स्टेबलविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस दलातच महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आनंद नाईक असे गुन्हा दाखल झालेल्या कॉन्स्टेबलचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पोलीस आणि आरोपी आनंद नाईक हे दोघेही मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. पीडित महिला कॉन्स्टेबलने दिलेल्या तक्रारीनुसार, नाईक हा विविध कारणांवरून मागील तीन वर्षांपासून तिचा सातत्याने मानसिक छळ करत होता. इतकेच नव्हे तर, त्याने वारंवार शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोपही तक्रारदार महिलेने केला आहे.
हे ही वाचा:
किश्तवाडमध्ये ड्युटीवरून बेपत्ता झालेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांची हत्या
ईशान्य भारतातील कर्तृत्ववानांचा होणार गौरव
मुंबई विमानतळावरील एकही आंतरराष्ट्रीय विमान नवी मुंबईत हलवणार नाही
मराठीत याला ढुंकूनही न बघणे म्हणतात…
सहकाऱ्याकडूनच होत असलेल्या या प्रकारामुळे पीडित महिला प्रचंड मानसिक तणावाखाली वावरत होती. आपल्याच खाकी वर्दीतील सहकाऱ्याकडून होणारा हा जाच तब्बल तीन वर्षे सहन केल्यानंतर अखेर या महिला कॉन्स्टेबलने धीर धरून ताडदेव पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि औपचारिक तक्रार नोंदवली.
या तक्रारीची ताडदेव पोलिसांनी तत्काळ गंभीर दखल घेतली आहे.
आरोपी कॉन्स्टेबल आनंद नाईक याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार लैंगिक छळ, मानसिक छळ आणि गुन्हेगारी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खाकी वर्दीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, ताडदेव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
