घरक्राईमनामाकुराणातील आयत कोरलेल्या करीना कपूर खानच्या पेंडंटवर काँग्रेसचा संताप

कुराणातील आयत कोरलेल्या करीना कपूर खानच्या पेंडंटवर काँग्रेसचा संताप

अब्बास हाफिज यांनी पाठवली कायदेशीर नोटीस

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान हिच्या दिवाळीतील लूकवरून नवा वाद निर्माण झाला आहे. दिवाळीनिमित्त केलेल्या फोटोशूटमध्ये तिने परिधान केलेल्या पाचूच्या पेंडंटवर कुराणातील आयत कोरलेली असल्याने हा वाद सुरू झाला आहे. या पेंडंटचा धार्मिक पवित्रतेचा विचार न करता फॅशनसाठी म्हणून वापर केल्याचा आक्षेप काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रीय मीडिया समन्वयक अब्बास हफीज यांनी घेतला आहे. याप्रकरणी त्यांनी करीना कपूर आणि तिची स्टायलिस्ट रिया कपूर यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

करीनाने दिवाळीनिमित्त डिझायनर पुनीत बालाना यांनी तयार केलेला सिल्व्हर कफ्तान आणि त्याला साजेशी पगडी परिधान केली होती. यासोबत तिने ३० कॅरेटचा पाचू असलेले पेंडंट घातले होते. या पेंडंटवर कुराणातील सूरह अल-बकराच्या २५५ व्या आयतीचा म्हणजेच ‘आयतुल कुर्सी’चा मजकूर कोरलेला आहे. हे सुमारे २०० वर्षे जुने पेंडंट भोपाळच्या माजी नवाबी घराण्याशी संबंधित असून, सैफ अली खानच्या कुटुंबाकडून करीना कपूरकडे आल्याचे सांगितले जाते. रिया कपूरने सोशल मीडियावर करीनाचे फोटो शेअर करताना या दागिन्याचा उल्लेख भोपाळच्या राजघराण्यातील वारसा म्हणून केला होता.

अब्बास हफीज यांनी ११ नोव्हेंबर रोजी पाठवलेल्या कायदेशीर नोटिशीत करीना आणि रिया कपूर यांच्याकडून संबंधित फोटो, व्हिडिओ आणि सोशल मीडिया पोस्ट हटवण्याची मागणी केली आहे. तसेच मुस्लिम समाजाची जाहीर माफी मागावी आणि भविष्यात या पवित्र आयतीचे धार्मिक महत्त्व कमी होईल अशा पद्धतीने सादरीकरण केले जाणार नाही, अशी हमी द्यावी, असेही नोटिशीत म्हटले आहे.

हे ही वाचा:

छेडछाडीला विरोध करणाऱ्या तरुणीला लोकलमधून ढकलले

किश्तवाडमध्ये ड्युटीवरून बेपत्ता झालेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांची हत्या

कुलगाम हल्ल्यापूर्वीच सीआरपीएफ जवानांना मिळाला होता इशारा?

लाभार्थी हिंदू, ताबा बांगलादेशींकडे? म्हाडाच्या ११० घरांवरून वाद

दरम्यान, भोपाळमधील हिंदू उत्सव समितीने करीनाला पाठिंबा दिला आहे. समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर तिवारी यांनी करीनाने कोणताही गुन्हा केला नसल्याचे सांगत तिच्याकडून माफी मागण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. धार्मिक प्रतीक किंवा पेंडंट श्रद्धेने परिधान करण्यात गैर काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version