‘पंतप्रधान नरेंद्र मोदी समोर आले की नजर चुकवतात, समोरा समोर बोलताना डोळ्यात डोळे घालून पाहात नाहीत’, असे मत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी त्यांच्या ‘बिलाँगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकात नोंदवले आहे. बहुधा त्यांना ठाऊक नसावे, मराठीत याला ढुंकूनही न बघणे म्हणतात. असे होते, अनेकदा एखादी व्यक्ति पाहून डोक्यात तिडीक जात असेल तर शहाणी माणसे त्या व्यक्तिकडे बघणे टाळतात. मोदी तेच करतायत, परंतु सोनियांना याची फारच खंत दिसते.
वयाच्या ७९ व्या वर्षी एखाद्याला आत्मचरीत्र प्रकाशित करावेसे वाटते ही चांगली बाब आहे. या वयात बरेच उन्हाळे-पावसाळे पाहिले असल्यामुळे सांगण्यासारखे बरेच काही असते. ‘कऱ्हेचे पाणी’ हे आचार्य अत्रेंचे आत्मचरीत्र आहे. हे आत्मचरीत्र म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा महत्वाचा दस्तावेज आहे. हे आत्मचरीत्र वाचताना त्या कालखंडातील महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण, समाजकारण तुमच्या नजरे समोर उभे राहते. ही संधी सोनिया गांधी यांनाही होती. भारताच्या दोन पंतप्रधानांच्या सानिध्यात त्या राहिल्या. दोन नेत्यांना पंतप्रधान पदावर विराजमान करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. गेल्या ५८ वर्षांच्या काळात बरेच काही त्यांच्या नजरे समोर घडले आहे. बरेच काही त्यांच्या कानावर पडले आहे. त्यात काही न सांगण्यासारख्या काही गोष्टी असू शकतील, उदा. त्यांचे आणि क्वात्रोचीचे संबंध, विवाहापूर्वीचे त्यांचे जीवन, त्या काळात जुळलेले ऋणानुबंध, माधवराव सिंधिया यांच्याशी असलेली त्यांची घट्ट मैत्री असे बरेच काही. रशीद किडवई त्यांच्या ‘हाऊस ऑफ सिंधियाज, अ सागा ऑफ पॉवर, पॉलिटीक्स, इन्ट्रीग’ या पुस्तकात म्हणतात, ‘माधवराव सिंधिया आणि सोनिया गांधी यांची खास मैत्री होती. त्यांच्यात इतकी जवळीक होती की, काँग्रेसमध्ये ज्या सोनिया मॅडम म्हणून ओळखल्या जात त्यांना सोनिया म्हणून हाक मारणाऱ्यांपैकी माधवराव होते. अनेकदा त्या माधवरावांना चहासाठी घरी आमंत्रित करत. जर माधवराव २००१ मध्ये विमान अपघातात दगावले नसते तर तेच मनमोहन सिंह यांच्या जागेवर पंतप्रधान झाले असते.’
हे फक्त किडवई यांच्या पुस्तकात नाही, माखनलाल फोतेदार यांच्या ‘चिनार लिव्हज’ या पुस्तकातही याबाबत काही संदर्भ आहेत. माधवराव आणि सोनिया गांधी यांच्याबाबत उठलेल्या अनेक वावड्यांबाबत इथे चर्चा करण्याची गरज नाही, परंतु हे सर्वश्रुत आहे.
अशा अनेक बाबतीत सोनियांनी मौन पाळले. प्रत्यक्षात संघ, भाजपा, मोदी, मनेका गांधी यांच्याबद्दलची खदखद व्यक्त करण्यासाठी या आत्मचरित्राचा त्यांनी वापर केला. ‘एखाद्या बैठकीत, समारोहात मोदी यांची भेट झाली तर ते अत्यंत औपचारिक वागतात. त्यामुळे या पुस्तकात त्यांना फार जागा देण्याची मला गरज वाटत नाही. समोर आले तर नमस्कार करतात किंवा प्रति नमस्कार करतात आणि निघून जातात. हॉस्पिटलमधून आल्यानंतर त्यांनी मला फोन केला होता. ‘तेव्हा प्रकृती कशी आहे’, असे त्यांनी विचारले. ‘मी ठीक आहे’, म्हटले एवढाच संवाद. पूर्वी असे वातावरण नव्हते, नेत्यांमध्ये पूर्वी असलेला मोकळेपणा आता दिसत नाही’, असे सोनिया या पुस्तकात म्हणतात. मग मोदींनी कसे वागावे, असे सोनियांना अपेक्षित होते? तुम्ही ‘मौत का सौदागर’ म्हणालात तेव्हा किती छान वाटले, ‘चायवाला’ म्हणून तुमच्या पक्षाचे लोक मला हिणवत होते तेव्हा मला कशा गुदगुल्या होत होत्या, सोहराबुद्दीन शेखच्या इन्काऊंटरचे निमित्त करून अमित शहांना तुरुंगात टाकलेत, माझाही काटा काढण्याचा तुमचा प्रयत्न होता, तेव्हाही मला पराकोटीचा आनंद झाला होता, अशा सगळ्या गप्पा मारत मोदींनी हास्य विनोद करावेत अशी सोनियांची इच्छा आहे काय?
‘श्रद्धा आणि संस्कृती हेच रा.स्व.संघाच्या विचारसरणीचे आधार आहेत. मोदी तीच नीती पुढे नेतायत. त्यामुळे देशात फूट पडलेली आहे. काँग्रेसला एक सर्वसमावेश समाज अपेक्षित होता’, असे सोनिया म्हणतात. सोनियांची सर्वसमावेशकतेची व्याख्या जगावेगळी आहे. त्यात हिंदू समाजाला, हिंदू आस्थांना स्थान नाही. त्यांची सर्वसमावेशकता हिरव्या रंगाची आहे. त्यांना भगव्याची एलर्जी आहे. या सर्वसमावेशकते मध्ये बाबराला स्थान आहे, श्रीरामाला नाही. बाटला हाऊसच्या दहशतवाद्यांना स्थान आहे, तिथे हुतात्मा झालेल्य इन्स्पेक्टर मोहनचंद शर्मांना नाही. त्यामुळेच या पुस्तकात सोनियांनी २०१४ मध्ये यूपीए सरकारने सादर केलेल्या ‘कम्युनल व्हायलेंस बिल’चे समर्थन केले आहे. जिथे दंगलीनंतरचे पीडित फक्त अल्पसंख्यक असतात, असे आधीच निश्चित कऱण्यात आले होते. फक्त अल्पसंख्यांक म्हटले तर फार बोंब होईल म्हणून त्यात मागास जाती आणि जनजातींचा समावेश करण्यात आला होता. दंगल झाली तर दोषी हिंदू समाजच असेल असे, या विधेयकात गृहीतच धरण्यात आले होते. भाजपाने जोरदार विरोध केल्यामुळे हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही. ही सोनिया गांधी यांची सर्वसमावेशकतेची व्याख्या आहे. म्हणून त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे दिवाळीच्या शुभेच्छा ‘खुशियो की ईद’ या शब्दात देतात. त्यांचा कटमुल्ला खासदार इमरान मसूद म्हणतो ‘दिवाली हो या प्रदूषण यह मानव जनित रोग है’.
‘पेंग्विन इंडिया’ने हे पुस्तक छापायला नकार दिला, ‘हार्पर कॉलीन्स’ने ५१० पाने १३१० रुपये किमतीचे हे पुस्तक १० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले. संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर एका अंधाऱ्या रात्री मनेका गांधी यांना घरातून हाकलून देण्यात आले होते, त्याचे वर्णन या पुस्तकात त्यावेळचा ‘रिएलिटी शो’ या शब्दात सोनिया करतात. थोडक्यात व्यक्तिगत हेवेदावे चव्हाट्यावर धुण्याचे काम या आत्मचरित्राच्या निमित्ताने सोनिया यांनी केले आहे. इतक्या जाडजुड पुस्तकात वोटचोरीबाबत एकही शब्द नाही हे विशेष.
हे ही वाचा:
…आणि इंदिरा गांधी-मनेका यांच्यात उडू लागले खटके
भारताविरुद्ध न्यूझीलंडची कसोटी फौज सज्ज
सचिनच्या १०० शतकांच्या साक्षीदार बॅट्स आता संग्रहालयात!
“जशी वेळ येईल, तशा गोष्टी समजतील!”
पंतप्रधान पदाच्या त्यागाचा दावा तर आहे, परंतु क्षमता नसलेल्या मुलाला पंतप्रधान पदी बसवण्याचा अट्टहास का, याचे उत्तर नाही. बऱ्याचशा थापा आहेत. शीख दंगल, आणीबाणी, शहाबानो प्रकरणात परिवाराला क्लिनचिट देण्याचा प्रय़त्न आहे. तपशीलात अनेक चुका आहेत. संघाची स्थापना कधी झाली हे त्यांना ठाऊक असण्याचे कारण नाही, स्थापनेचे साल त्यांनी चुकवले आहे. संघाबद्दल त्यांना फक्त चुकीची माहिती आहे, हे पुस्तकातून पुन्हा सिद्ध होते. अण्णा आंदोलनाचे साल चुकले आहे. जे अहमद पटेल आयुष्यभर त्यांचे सल्लागार म्हणून ओळखले गेले त्यांच्या मृत्यूचे सालही सोनियांना लक्षात नसावे, हे जरा अतिच वाटते. बहुधा पवन खेरा यांना सोनिया जशा सफेद बाला वाला म्हणतात तसे अहमद पटेल यांच्यासाठी सुद्धा एखादे विशेषण असावे काले तिलवाला वगैरे…
भारतीय जनतेच्या मनात सोनिया गांधी यांच्या पूर्वीयुष्याबाबत बरेच प्रश्न आहेत. त्याची उत्तरे या पुस्तकातून मिळतील अशी अपेक्षा होती. आधी संजय गांधी यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या हत्या झाल्या. सोनिया-राजीव यांचे अत्यंत निकटवर्तीय माधवराव सिंधिया, राजेश पायलट यांचेही संशयास्पद अपघाती मृत्यू झाले. सोनियांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्या परिवारातील प्रत्येकाचा मृत्यू संशयास्पद आहे. बहीण मिशेल वाड्रा यांचा १६ एप्रिल २००१ रोजी राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात कारचा टायर फुटून अपघाती मृत्यू झाला, दोन वर्षांनंतर २००३ रोजी भाऊ रिचर्ड वाड्रा याचा उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे मृत्यू झाला. राहत्या घरात गळफास लावून त्याने आत्महत्या केली.
२००९ मध्ये वडील राजेंद्र वाड्रा यांनीही दिल्लीतील युसफ सराय भागातील ‘सिटी इन’ या गेस्ट हाऊसमध्ये आत्महत्या केली. याचा एका ओळीतही सोनियांच्या पुस्तकात उल्लेख नाही. असे अनेक उल्लेख टाळण्यात आले आहेत. वडील राजेंद्र वाड्रा आणि भाऊ रिचर्ड सोबत रॉबर्ट वाडरा यांनी संबंध तोडल्याची जाहिरातच प्रसिद्ध केली होती. राजेंद्र यांचे मोठा भाऊ ओम प्रकाश वाड्रा यांनी १९९५ मध्ये त्यांची काही जमीन आणि मालमत्ता अशा एका संस्थेला दिली होती जिचा संघाशी थेट संबंध होता. २००१ ते २००९ या काळात वाडरा परिवारातील तीन जण संशयास्पदरित्या मृत्यूमुखी पडले. आपले आत्मचरीत्र प्रसिद्ध झाल्यानंतर तमाशा होईल, असे भाकीत सोनिया यांनी केले होते. ते खरे ठरण्याची शक्यता आहे. मोदी, संघ तर त्यांना उत्तर देण्याची शक्यता नाही. परंतु मनेका आणि वरुण गांधी गप्प बसतील याची शक्यता नाही.
(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
