घरविशेषपुण्याचे नाव फुलेनगर करा!

पुण्याचे नाव फुलेनगर करा!

राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाने केली मागणी

महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख असलेल्या पुणे शहराचे नाव बदलून ‘फुले नगर’ करण्यात यावे, अशी मागणी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाने यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन पुण्याचे नामांतर करण्याची मागणी केली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांची कर्मभूमी असलेल्या पुण्याचे नाव त्यांच्या सन्मानार्थ ‘फुले नगर’ करण्यात यावे, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.

द्विशताब्दी वर्षानिमित्त मागणी

राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, २०२७ मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती अर्थात द्विशताब्दी वर्ष साजरे केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेने पुण्याचे नाव बदलून ‘फुले नगर’ करण्याची मागणी केली आहे. महात्मा फुले यांनी समाजसुधारणा आणि शिक्षणाच्या क्षेत्रात ऐतिहासिक कार्य केले असून, पुणे ही त्यांची कर्मभूमी होती. त्यामुळे त्यांच्या सामाजिक योगदानाचा आणि कार्याचा सन्मान करण्यासाठी शहराचे नामांतर करण्यात यावे, असे संघटनेचे म्हणणे आहे.

हे ही वाचा:

मूडीजकडून भारताच्या आर्थिक विकासदराचा अंदाज वाढवला

मॉर्निंग वॉकदरम्यान माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड बेशुद्ध होऊन कोसळले

“जशी वेळ येईल, तशा गोष्टी समजतील!”

सचिनच्या १०० शतकांच्या साक्षीदार बॅट्स आता संग्रहालयात!

यासंदर्भात संघटनेच्या प्रतिनिधींनी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले.

‘भारतरत्न’ देण्याचीही मागणी

पुण्याचे नामांतर करण्याबरोबरच महात्मा ज्योतिबा फुले यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात यावा, अशी मागणीही राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाने केली आहे. पुण्याला शिक्षण क्षेत्रात विशेष ओळख मिळवून देण्यात महात्मा फुले यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना भारतरत्न देण्यात यावा, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पुण्याच्या नामांतराचा प्रस्ताव पुढे गेल्यास त्याला सर्वपक्षीय संमतीने मंजुरी मिळावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे. यासाठी राज्य सरकारने विधानसभेचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले हे महाराष्ट्रातील अग्रगण्य समाजसुधारकांपैकी एक मानले जातात. त्यांनी जातिव्यवस्था, अस्पृश्यता आणि सामाजिक भेदभावाविरोधात आवाज उठवला. समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे साधन असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version