१९८० च्या दशकातील हा जुना घरगुती व्हिडिओ अलीकडेच पुन्हा समोर आला असून, त्यातून मनेका गांधी आणि नेहरू-गांधी कुटुंबातील इतर सदस्यांमधील दीर्घकाळापासूनचा दुरावा अधोरेखित होत असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडिओमध्ये नेहरू-गांधी कुटुंबातील सदस्य जेवणाच्या टेबलाभोवती बसलेले दिसतात. त्यामध्ये इंदिरा गांधी, सोनिया गांधी, लहान राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मनेका गांधी यांचा समावेश आहे.
राजकीय विश्लेषकांसह अनेक निरीक्षकांनी या व्हिडिओतील शेवटच्या दृश्यांकडे लक्ष वेधले आहे. त्यात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि मनेका गांधी यांच्यातील संबंधांमध्ये कमालीचा थंडपणा असल्याचे दिसत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रानुसार, संजय गांधी यांची मनेका आनंद यांच्याशी १९७३ च्या अखेरीस एका मित्राच्या साखरपुड्याच्या समारंभात भेट झाली होती. सोनिया यांनी मनेका यांचे वर्णन संजय यांच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान, सुंदर आणि उत्साही तरुणी असे केले आहे. त्या वेळी मनेका अल्पवयीन होत्या. त्यामुळे इंदिरा गांधी यांनी संजय यांना मनेका अठरा वर्षांच्या होईपर्यंत प्रतीक्षा करण्यास सांगितले होते. जुलै १९७४ मध्ये त्यांचा साखरपुडा झाला आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये साध्या नागरी पद्धतीने विवाह पार पडला. इंदिरा गांधी यांनी मनेका यांच्या साडीचे कापड भेट दिले होते.
सुरुवातीच्या काळातील आठवणी सांगताना सोनिया गांधी लिहितात, मनेका अतिशय उत्साही, बोलक्या आणि चैतन्याने भरलेल्या होत्या. घरात आपल्यापेक्षा लहान वयाच्या जाऊबाई असणे सुरुवातीला आनंददायी वाटले. प्रियंका अनेकदा मनेका यांच्या खोलीत जाऊन त्यांच्या गोष्टी ऐकत बसत असे. मात्र, या नात्यातील तणाव फार काळ लपून राहिला नाही.
‘बडी बहुरानी’ आणि ‘छोटी बहू’
घरातील कर्मचारी सोनिया गांधी यांना ‘बहुरानी’, तर मनेका गांधी यांना ‘छोटी बहू’ असे संबोधत असत. सोनिया यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या दृष्टीने घरातील दोन्ही सुना समान होत्या. मात्र, मनेका यांना हे संबोधन आपला कमीपणा दाखवणारे वाटत असावे, असे सोनिया यांनी लिहिले आहे. संजय गांधी आणि मनेका यांच्यातील मतभेदही हळूहळू स्पष्ट होऊ लागले होते. मनेका नाराज झाल्या की घरात वापरण्यास मनाई असलेले अपशब्द बोलत असत. अगदी सासूबाई इंदिरा गांधी उपस्थित असतानाही त्या असे शब्द वापरत. त्यामुळे संजय यांना संकोच वाटत असे आणि कुटुंबातील इतर सदस्यांनाही धक्का बसत असे.
आणीबाणीच्या काळात तणाव वाढला
आणीबाणीच्या काळात कुटुंबातील वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले. सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रानुसार, इंदिरा गांधी यांनी तत्कालीन कॅबिनेट सचिव पी. एन. धर यांच्याशी मनेका यांच्याबद्दल बोलताना, “उसके अभी से पर निकलने लगे हैं,” म्हणजेच “तिला आतापासूनच पंख फुटू लागले आहेत,” अशी टिप्पणी केली होती.
सोनिया यांच्या मते, मनेका संजय गांधी यांच्या कामांवर नियंत्रण ठेवण्याऐवजी त्यांना प्रोत्साहन देत होत्या आणि त्यांच्या कामकाजात हस्तक्षेपही करत होत्या. १९७७ मध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर कुटुंबातील चर्चांमध्ये कटुता अधिक वाढली.
राजीव-संजय वाद
सोनिया गांधी यांनी आपल्या आत्मचरित्रात आणीबाणीच्या काळातील अतिरेकांसाठी संजय गांधी यांना जबाबदार धरले आहे. संजय यांच्या खोलीत झालेल्या एका चर्चेदरम्यान राजीव गांधी यांनी संजय यांना उद्देशून, “संजय, मी तुला कधीही माफ करू शकत नाही. तू आईला या परिस्थितीत आणून ठेवलेस,” असे म्हटले होते. इंदिरा गांधी यांनीही राजीव यांच्या म्हणण्याला सहमती दर्शवली होती. यावेळी मनेका यांनी हस्तक्षेप केला असता, इंदिरा गांधी यांनी आवाज चढवत त्यांना या आरोपाचे खंडन करण्याचे आव्हान दिले होते, असे सोनिया यांनी लिहिले आहे.
संजय गांधी यांच्या निधनानंतर नेहरू-गांधी कुटुंबात फूट
२३ जून १९८० रोजी विमान अपघातात संजय गांधी यांचे निधन झाले. त्यावेळी मनेका गांधी अवघ्या २३ वर्षांच्या होत्या. त्यांचा तीन महिन्यांचा मुलगा फिरोज वरुण म्हणजेच आजचे वरुण गांधी त्यांच्यासोबत होते.
सुरुवातीला इंदिरा गांधी यांनी मनेका यांची काळजी घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, केनिया, फ्रान्स आणि इटली या देशांच्या अधिकृत दौऱ्यांवर त्यांना सोबत नेले. पॅरिसमध्ये त्यांच्यासाठी उबदार कोटही खरेदी केला होता. मात्र, राजकीय मतभेदांमुळे दोघींमधील संबंध पुन्हा तणावपूर्ण बनले.
वरुण गांधी यांच्या वाढदिवसावरून वाद
मार्च १९८१ मध्ये वरुण गांधी यांच्या पहिल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या वेळी दोन्ही बाजूंमधील मतभेद अधिक स्पष्ट झाले. इंदिरा गांधी यांनी हा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याची सूचना केली होती. मात्र, नंतर त्यांना समजले की हा कार्यक्रम वसुंधरा राजे यांच्या घरी आयोजित करण्यात आला होता. वसुंधरा राजे या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कट्टर समर्थक आणि इंदिरा गांधी यांच्या राजकीय विरोधक असल्याचे सोनिया यांनी नमूद केले आहे. हा कार्यक्रम इंदिरा गांधी यांना दुखावण्याच्या उद्देशानेच आयोजित करण्यात आल्याचे त्यांना वाटले होते. यानंतर मनेका यांच्या ‘सूर्या’ या मासिकाची विक्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एका व्यक्तीला करण्यात आली. सोनिया यांच्या मते, ही कृती केवळ इंदिरा गांधी यांचा अपमान नव्हती, तर संजय गांधी आणि त्यांच्या वडिलांच्या स्मृतीचाही अपमान होता.
मनेकांनी सोडले इंदिरा गांधीचे घर
मनेका गांधी यांनी इंदिरा गांधी लंडन दौऱ्यावर असताना लखनऊ येथे विरोधी गटाने आयोजित केलेल्या एका सभेला हजेरी लावली. त्यानंतर इंदिरा गांधी भारतात परतल्यावर दोघींमध्ये अंतिम संघर्ष झाला. इंदिरा गांधी यांनी मनेका यांना स्पष्टपणे सांगितले की, कुटुंबातील सदस्य म्हणून त्यांना अशा प्रकारच्या राजकीय बंडखोर कारवाया सुरू ठेवता येणार नाहीत. त्यांनी एकतर अशा राजकीय हालचाली थांबवाव्यात किंवा अन्यत्र राहण्याचा निर्णय घ्यावा, असे इंदिरा गांधी यांनी सांगितले होते.
मनेका यांनी घर सोडण्याच्या घटनेला प्रसारमाध्यमांनी दिलेल्या प्रसिद्धीमुळे त्या काळातील एक कौटुंबिक घटना आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास ‘रिऍलिटी शो’सारखी बनली होती, असे सोनिया यांनी नमूद केले आहे. मार्च १९८२ मध्ये मनेका गांधी यांनी आपला मुलगा वरुण याच्यासह सफदरजंग रोडवरील इंदिरा गांधी यांचे निवासस्थान सोडले. दुसऱ्याच दिवशी लहानग्या वरुणला घेऊन घराबाहेर पडणाऱ्या मनेका यांचे छायाचित्र देशातील प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानांवर प्रसिद्ध झाले होते.
यानंतर मनेका यांनी ‘संजय विचार मंच’ या संघटनेची स्थापना केली आणि अमेठी मतदारसंघात राजीव गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवली. या काळात त्यांनी आमच्याविरोधात दुर्भावनापूर्ण आरोप केले, असे सोनिया यांनी म्हटले आहे. वरुण गांधी यांना भेटण्याचा प्रश्नही कुटुंबातील वेदनेचा विषय बनला. अखेरीस इंदिरा गांधी यांनी वरुण यांना भेटण्याचा अधिकार मिळावा यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली होती.
