घरबिजनेसदिवा रेल्वे फाटक तब्बल २५ मिनिटे खुले

दिवा रेल्वे फाटक तब्बल २५ मिनिटे खुले

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेच्या दिवा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक तब्बल २५ मिनिटे खुले राहिल्याने बुधवारी रेल्वे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे रेल्वे फाटक बंद करण्यात अडथळा निर्माण झाला. परिणामी, मध्य रेल्वेच्या लोकलसह मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. या घटनेमुळे तब्बल नऊ लोकल आणि पाच मेल-एक्स्प्रेस गाड्या खोळंबल्या. लोकल गाड्या उशिराने धावल्याने कामावर जाणाऱ्या तसेच घरी परतणाऱ्या प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

रेल्वे प्रशासनाच्या नोंदीनुसार, दिवा स्थानकाजवळील एलएक्स-२९ हे रेल्वे फाटक दुपारी १ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास खुले राहिले. रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने फाटक बंद करणे शक्य झाले नाही. त्यामुळे सुमारे २५ मिनिटे रेल्वे वाहतूक प्रभावित झाली. या काळात अप आणि डाऊन मार्गावरील लोकल तसेच मेल-एक्स्प्रेस गाड्यांना थांबावे लागले. परिणामी, रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आणि प्रवाशांचा प्रवासाचा वेळ वाढला.
हे ही वाचा:
…आणि इंदिरा गांधी-मनेका यांच्यात उडू लागले खटके

ब्रिटनमध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी व्याजमुक्त ‘शरिया’ कर्ज योजना

कुलगाममध्ये बाईकवरून आलेल्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांना केले लक्ष्य

चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी नागरिक सरसावले; अडीच टन कचरा जमा

दिवा रेल्वे फाटकाचा प्रश्न नवीन नाही. या ठिकाणी दिवसाला सरासरी ३९ वेळा फाटक बंद करावे लागते. दिवा पूर्व आणि पश्चिम भागांना जोडण्यासाठी वाहनांना रेल्वेच्या तब्बल १० मार्गिका ओलांडाव्या लागतात. त्यामुळे फाटक बंद होण्यापूर्वी आणि उघडल्यानंतर वाहनांची मोठी गर्दी होते. रस्ते वाहतुकीचा वाढता ताण आणि रेल्वे वाहतुकीचे नियोजन यांचा समतोल राखणे प्रशासनासाठी आव्हान ठरत आहे. फाटक अधिक काळ खुले राहिल्यास लोकल सेवा रखडते आणि त्याचा परिणाम मध्य रेल्वेच्या एकूण वक्तशीरपणावर होतो.

दरम्यान, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी २०१३ मध्ये दिवा उड्डाणपुलाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र, ठाणे महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे या पुलाचे काम अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. रेल्वे प्रशासनाने आपल्या हद्दीतील कामे पूर्ण केली असली, तरी ठाणे महापालिकेच्या हद्दीतील भूसंपादन आणि इतर पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांमुळे प्रकल्प रखडला आहे. परिणामी, दिव्यातील रस्ते वाहतूक कोंडीचा फटका रेल्वे प्रवाशांनाही बसत आहे. त्यामुळे दिवा उड्डाणपुलाचे काम तातडीने पूर्ण करून रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version