पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या १३८व्या भागात माजी भारतीय हॉकीपटू आणि प्रशिक्षक राजिंदर सिंह सीनियर यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. गाव आणि छोट्या शहरांमधील युवा हॉकीपटूंमधील प्रतिभा शोधून त्यांना घडवण्यासाठी राजिंदर सिंह करत असलेल्या प्रयत्नांचे मोदी यांनी कौतुक केले.
राजिंदर सिंह यांचा जन्म ७ जानेवारी १९५८ रोजी अमृतसरमध्ये झाला. भारतीय हॉकी संघात ते डिफेंडर आणि पेनल्टी कॉर्नर तज्ज्ञ म्हणून खेळले. १९८० मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे ते सदस्य होते. त्यानंतर १९८१-८२ हॉकी विश्वचषकातही त्यांनी प्रभावी कामगिरी करत १२ गोल केले.
खेळाडू म्हणून निवृत्तीनंतर राजिंदर सिंह यांनी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली. २००१ मध्ये भारताने पहिल्यांदा पुरुष ज्युनियर हॉकी विश्वचषक जिंकला, त्यावेळी राजिंदर सिंह संघाचे प्रशिक्षक होते. त्यानंतर २००३ मध्ये भारताने सीनियर आशिया कपचे विजेतेपद पटकावले, त्यावेळीही त्यांनी प्रशिक्षकाची भूमिका बजावली.
गावागावांतून शोधतात नवे खेळाडू
सध्या राजिंदर सिंह राउंडग्लास हॉकी अकादमीच्या माध्यमातून युवा खेळाडूंना प्रशिक्षण देत आहेत. ग्रामीण भागात हॉकीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि प्रशिक्षणाची संधी कमी असलेल्या गावांमधून प्रतिभावान खेळाडू शोधणे, यावर त्यांचा भर आहे.
त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक युवा खेळाडूंना ज्युनियर आणि सीनियर स्तरावरील संघांमध्ये स्थान मिळत आहे. खेळाडू म्हणून देशाला ऑलिम्पिक सुवर्ण मिळवून देणारे राजिंदर सिंह आता प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून नव्या पिढीतील हॉकीपटू घडवत आहेत.
‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या कार्याचा उल्लेख केल्याने राजिंदर सिंह यांच्या दीर्घकाळच्या हॉकी योगदानाला पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर अधोरेखित करण्यात आले.
