घरस्पोर्ट्सपृथ्वी शॉचा आकृती अग्रवालशी काडीमोड

पृथ्वी शॉचा आकृती अग्रवालशी काडीमोड

भारतीय क्रिकेट संघातून बाहेर असलेला सलामीवीर पृथ्वी शॉ सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. शॉची मंगेतर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर-अभिनेत्री आकृती अग्रवाल हिने सोशल मीडियावर पोस्ट करत दोघेही विभक्त झाल्याची माहिती दिली आहे.

आकृतीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटले की, भविष्यासाठीची वेगवेगळी उद्दिष्टे आणि परिस्थिती लक्षात घेऊन दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

तिने लिहिले, “जड अंतःकरणाने मी सांगू इच्छिते की, माझ्या मंगेतराने आणि मी आमच्या भविष्यासाठीची वेगवेगळी उद्दिष्टे आणि परिस्थिती लक्षात घेऊन वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांवर जितके प्रेम आणि काळजी करतो, तितकेच आम्हाला हे मान्य करावे लागले की, आमचे मार्ग एकत्र राहण्यासाठी बनलेले नाहीत. आमच्या जबाबदाऱ्या आणि सध्याच्या परिस्थितीचा विचार करून आम्ही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.”

आकृतीने पुढे दोघांच्या भविष्यासाठी शांतता आणि आनंदाची इच्छा व्यक्त केली. तसेच या कठीण काळात त्यांच्या खासगी आयुष्याचा आदर करावा आणि विभक्त होण्यामागील कारणांबाबत अंदाज बांधू नये, असे आवाहन तिने केले.

पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांनी ८ मार्च २०२६ रोजी सगाई केली होती. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. आकृतीच्या पोस्टनंतर दोघे विभक्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

२६ वर्षीय पृथ्वी शॉ याच्याकडे एकेकाळी भारतीय क्रिकेटचा पुढील मोठा स्टार म्हणून पाहिले जात होते. २०१८ मध्ये वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि पदार्पणाच्या सामन्यातच शतक झळकावले.

मात्र, त्यानंतर त्याच्या फॉर्ममध्ये घसरण झाली आणि भारतीय संघातील स्थान गमवावे लागले. सध्या शॉला देशांतर्गत क्रिकेटसह आयपीएलमध्येही स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version