घरस्पोर्ट्सपिछाडीवरून झेप घेत शीतल देवीचे सुवर्णयश!

पिछाडीवरून झेप घेत शीतल देवीचे सुवर्णयश!

एशियन पॅरा गेम्स २०२६ मध्ये भारतीय पॅरा तिरंदाज शीतल देवी हिने आपल्या अफाट जिद्दीच्या जोरावर आणखी एका सुवर्णपदकाला गवसणी घातली. महिलांच्या वैयक्तिक कंपाउंड प्रकाराच्या अंतिम सामन्यात शीतलने सिंगापूरच्या नूर स्याहिदा अलीम हिचा १४२-१३९ असा पराभव करत भारताला स्पर्धेतील १७वे सुवर्णपदक मिळवून दिले. विशेष म्हणजे, पिछाडीवर पडल्यानंतरही शानदार पुनरागमन करत शीतलने मागील स्पर्धेतील विजेतेपद कायम राखले.

अंतिम सामन्यात शीतलची कसोटी पाहणारा संघर्ष रंगला. एका टप्प्यावर ती ५५-५९ अशी चार गुणांनी पिछाडीवर होती. दुसऱ्या फेरीत तिला केवळ २६ गुण मिळाल्याने सुवर्णपदकाचे आव्हान कठीण झाले होते. मात्र, अवघ्या १८ वर्षांच्या शीतलने हार न मानता जोरदार पुनरागमन केले. सलग दोन फेऱ्यांमध्ये प्रत्येकी ३० गुणांची अचूक कामगिरी करत तिने सामन्याचे पारडे आपल्या बाजूने झुकवले आणि अखेर सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

पात्रता फेरीत विश्वविक्रमाशी बरोबरी

शीतलने नागोया येथील स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत आपली गुणवत्ता पुन्हा सिद्ध केली. पात्रता फेरीत तिने ७२० पैकी तब्बल ७०४ गुण मिळवत विश्वविक्रमाशी बरोबरी साधली. यासोबतच मार्चमध्ये बँकॉक येथे स्वतःच नोंदवलेला ६९८ गुणांचा आशियाई विक्रमही तिने मागे टाकला.

सांघिक प्रकारातही सुवर्णाची कमाई

वैयक्तिक सुवर्णपदकासोबतच शीतलने तोमन कुमारच्या साथीने मिश्र सांघिक कंपाउंड प्रकारातही सुवर्णपदक जिंकले. भारतीय जोडीने इंडोनेशियाचा १५१-१४८ असा पराभव केला. या जोडीने मिश्र सांघिक पात्रता फेरीत १,४०२ गुणांची नोंद करत १,४०० गुणांचा जुना विश्वविक्रम मोडला होता.

महिलांच्या कंपाउंड दुहेरी प्रकारात शीतलने पायल नागच्या साथीने रौप्यपदकाची कमाई केली. या जोडीने पात्रता फेरीत १,३७९ गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले होते. याच कामगिरीदरम्यान त्यांनी आशियाई आणि एशियन पॅरा गेम्सचे नवे विक्रमही प्रस्थापित केले.

तीन पदकांसह स्पर्धेची सांगता

नागोया येथे शीतलने दोन सुवर्ण आणि एक रौप्य अशी एकूण तीन पदके जिंकली. एशियन पॅरा गेम्स २०२३ मध्येही तिने अशीच तीन पदके मिळवली होती. आपल्या अचूक नेमबाजीने, संयमाने आणि जिद्दीने शीतलने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पॅरा तिरंदाजीतील आपले वर्चस्व अधोरेखित केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version