सय्यद मुश्ताक अली करंडक २०२६ स्पर्धेत मुंबईने विजयी सलामी देताना हैदराबादचा ७ विकेट्सनी धुव्वा उडवला. कर्णधार सूर्यकुमार यादव याने मैदानावर चौकार-षटकारांची आतषबाजी करत अवघ्या २१ चेंडूंत नाबाद ६० धावांची वादळी खेळी साकारली. त्याला मुशीर खानने अर्धशतकी खेळीची साथ दिल्याने मुंबईने १७३ धावांचे लक्ष्य अवघ्या १३.१ षटकांत पूर्ण केले.
टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारताला विजेतेपद मिळवून देणाऱ्या सूर्यकुमार यादवचे स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन झाले. आयपीएलनंतर प्रथमच तो उच्चस्तरीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसला. आपल्या आक्रमक फलंदाजीने त्याने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. सूर्यकुमारने २१ चेंडूंत ६ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ६० धावा फटकावल्या. विशेष म्हणजे त्याने अवघ्या १५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.
मुंबईसमोर १७३ धावांचे लक्ष्य ठेवताना हैदराबादचा संघ २० षटकांत १७२ धावांवर सर्वबाद झाला. अभिराथ रेड्डीने २४ चेंडूंत ३५, तर कोदिमेला हिमातेजाने १६ चेंडूंत २५ धावा केल्या. कर्णधार चामा व्ही. मिलिंदने अखेरच्या षटकांमध्ये १२ चेंडूंत २२ धावांची आक्रमक खेळी केली.
प्रत्युत्तरात मुंबईला अंगक्रिश रघुवंशी (२७) आणि हार्दिक तमोरे (२२) यांनी वेगवान सुरुवात करून दिली. त्यानंतर सूर्यकुमार आणि मुशीर खान यांनी हैदराबादच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. मुशीरने अवघ्या २४ चेंडूंत ५१ धावा फटकावत अर्धशतक झळकावले. या दोघांनी मिळून धावांचा वेग प्रचंड वाढवला.
सूर्यकुमारने नवव्या षटकात वेद रेड्डीच्या गोलंदाजीवर २२ धावा वसूल केल्या, तर पुढील षटकात मुशीरच्या साथीने प्रणव वर्माच्या गोलंदाजीवर २४ धावा कुटल्या. मुशीर ५१ धावांवर बाद झाल्यानंतर शिवम दुबेने पाच चेंडूंत नाबाद १३ धावा करत षटकार ठोकून मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
सूर्यकुमारच्या वादळी फलंदाजीमुळे मुंबईने स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात आपले वर्चस्व सिद्ध केले.
