घरस्पोर्ट्स‘द हंड्रेड’मध्ये अबरार अहमदवरून वाद पेटला!

‘द हंड्रेड’मध्ये अबरार अहमदवरून वाद पेटला!

इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड आयोजित ‘द हंड्रेड’ स्पर्धेत सनराइजर्स लीड्सने पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमदला खरेदी केल्यामुळे निर्माण झालेला वाद अजूनही शांत होताना दिसत नाही. भारतीय क्रिकेटचे दिग्गज सुनील गावस्कर यांनी या निर्णयावर टीका केली होती, त्यावर आता पाकिस्तानी वंशाचे क्रिकेटर अजीम रफीक यांनी कडाडून प्रतिक्रिया दिली आहे.

अजीम रफीक यांनी सोशल मीडियावर गावस्करांच्या वक्तव्याला “हास्यास्पद आणि खालच्या दर्जाचे” असे संबोधत सवाल उपस्थित केला की, इतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही त्यांनी असा दृष्टिकोन घेतला आहे का? मैदानावरील कामगिरीमुळे अशा विधानांना समर्थन मिळत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कराचीमध्ये जन्मलेले अजीम रफीक इंग्लंडमध्ये स्थायिक असून त्यांनी इंग्लंडच्या अंडर-१९ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच यॉर्कशायर आणि डर्बीशायरसारख्या काउंटी संघांकडूनही त्यांनी क्रिकेट खेळले आहे.

दरम्यान, सुनील गावस्कर यांनी एका कॉलममध्ये सनराइजर्स लीड्सच्या निर्णयावर टीका करताना म्हटले होते की, पाकिस्तानी खेळाडूंना दिले जाणारे पैसे कराच्या माध्यमातून पाकिस्तान सरकारपर्यंत पोहोचू शकतात आणि त्याचा वापर शस्त्र खरेदीसाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच एखादी स्पर्धा जिंकणे भारतीयांच्या जीवापेक्षा महत्त्वाचे आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.

गावस्कर यांनी पुढे नमूद केले की, संघाचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी यांना कदाचित या संवेदनशील मुद्द्याची पूर्ण जाणीव नसावी, मात्र याची जबाबदारी फ्रँचायझी मालकांवर येते.

‘द हंड्रेड २०२६’ च्या लिलावात सनराइजर्स लीड्सने अबरार अहमदला सुमारे १.९ लाख पाउंड (सुमारे २.३४ कोटी रुपये) मोजून आपल्या संघात सामील केले. या निर्णयावर भारतात मोठा विरोध होत आहे.

यापूर्वी अशी चर्चा होती की भारतीय मालकीच्या संघांकडून पाकिस्तानी खेळाडूंना खरेदी केले जाणार नाही. ईसीबीने सर्व फ्रँचायझींना भेदभावविरोधी नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले होते. तरीही इतर संघांनी पाकिस्तानी खेळाडूंना टाळले, मात्र सनराइजर्स लीड्सने हा निर्णय घेतल्याने त्यांना चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

सोशल मीडियावर काही चाहत्यांनी आयपीएल २०२६ मध्ये सनराइजर्स हैदराबादच्या बहिष्काराची धमकीही दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version