घरस्पोर्ट्सश्री चरणी अजूनही नंबर वन

श्री चरणी अजूनही नंबर वन

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केलेल्या ताज्या महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत भारताची फिरकीपटू श्री चरणी हिने अव्वल स्थान कायम राखले आहे. मात्र, महिला टी-२० विश्वचषकातील दमदार कामगिरीमुळे इंग्लंडच्या सोफी एक्लेस्टोन आणि लॉरेन बेल यांनी तिच्या अव्वल स्थानाला कडवे आव्हान निर्माण केले आहे.

श्री चरणीने विश्वचषकात १४ बळी घेत प्रभावी कामगिरी केली. भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असले, तरी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचे संघ अद्याप उपांत्य फेरीच्या शर्यतीत असल्याने त्यांच्या खेळाडूंना आणखी गुण मिळवण्याची संधी आहे. त्यामुळे श्री चरणीच्या नंबर वन स्थानावर धोका कायम आहे.

ताज्या क्रमवारीत सोफी एक्लेस्टोन एका स्थानाने सुधारणा करत तिसऱ्या, तर वेगवान गोलंदाज लॉरेन बेल तीन स्थानांची झेप घेत चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेची फिरकीपटू नोंगकुलुलेको म्लाबा पाचव्या, तर पाकिस्तानची नाश्रा संधू नवव्या क्रमांकावर पोहोचली आहे.

इतर गोलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रिकेची मरिझान कॅप सात स्थानांची झेप घेत १४व्या, स्कॉटलंडची कर्णधार कॅथरीन ब्राईस १७ स्थानांनी पुढे जात २६व्या, तर न्यूझीलंडची ब्री इलिंग ३१व्या क्रमांकावर पोहोचली आहे.

फलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाची सलामीवीर जॉर्जिया व्होल अव्वल स्थानावर कायम आहे. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट संयुक्त तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली असून, श्रीलंकेची चामरी अट्टापट्टू दोन स्थानांची सुधारणा करत सातव्या क्रमांकावर आली आहे.

इंग्लंडची डॅनी वायट-हॉज पाच स्थानांची झेप घेत ११व्या, ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी १७व्या, दक्षिण आफ्रिकेची अॅनेरी डर्कसेन २४व्या, तर स्कॉटलंडची डार्सी कार्टर ४२व्या क्रमांकावर पोहोचली आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत मात्र कोणताही बदल झालेला नाही. वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूज अव्वल स्थानावर कायम असून न्यूझीलंडची अमेलिया केर दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयर्लंडची ऑर्ला प्रेंडरगास्ट दोन स्थानांची झेप घेत संयुक्त तिसऱ्या, तर मरिझान कॅप आठव्या आणि कॅथरीन ब्राईस अकराव्या क्रमांकावर पोहोचली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version