टॉप सीड आरिना सबालेंका हिने तिसऱ्या मानांकित अमेरिकेच्या जेसिका पेगुलाचा ७-५, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव करत यूएस ओपन २०२६ महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता सलग तिसरे यूएस ओपन विजेतेपद पटकावण्यासाठी सबालेंकाला केवळ एका विजयाची गरज आहे.
आर्थर अॅश स्टेडियमवर झालेल्या उपांत्य सामन्यात सबालेंकाने दमदार सर्व्हिस आणि आक्रमक ग्राउंडस्ट्रोकच्या जोरावर पेगुलाला सामन्यात पुनरागमनाची संधीच दिली नाही. या पराभवासह पेगुलाचे पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावण्याचे स्वप्नही भंगले.
पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी आपापली सर्व्हिस राखत सामना १२व्या गेमपर्यंत नेला. सबालेंका ६-५ अशी आघाडीवर असताना तिच्या आक्रमक ग्राउंडस्ट्रोकसमोर पेगुलाची चांगलीच अडचण झाली. पेगुला ०-४० अशी पिछाडीवर गेल्यानंतर सबालेंकाने सेट आपल्या नावावर केला.
दुसऱ्या सेटमध्येही सबालेंकाने आपला वेग कायम ठेवला. पेगुलाच्या दुसऱ्या सर्व्हिसवर तिने सातत्याने हल्ला चढवला आणि शानदार फोरहँडच्या जोरावर ३-१ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर पेगुलाला पुनरागमनाची संधी न देता सबालेंकाने सामना सहज खिशात घातला.
सबालेंकाने सामन्यात ७ एस आणि २९ विनर्स लगावले.
या विजयानंतर सबालेंका सलग चौथ्यांदा यूएस ओपनच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. जर तिने २०२६ चे विजेतेपद पटकावले, तर सलग तीन यूएस ओपन जेतेपद जिंकणारी ती क्रिस एवर्ट आणि सेरेना विल्यम्स यांच्यानंतरची तिसरी महिला खेळाडू ठरेल.
विजयानंतर सबालेंका म्हणाली, “मी खूप आनंदी आहे की मला असा टेनिस खेळता आला. मला जिंकण्याची खूपच इच्छा होती. मला हे विजेतेपद खूप हवे होते.”
अंतिम सामन्यात सबालेंकाचा सामना एलेना रायबाकिना किंवा कोको गॉफ यांच्यापैकी एका खेळाडूशी होणार आहे.
