अंधेरीतील एका नामांकित वैद्यकीय उपकरण विक्रेत्याच्या कार्यालयावर बनावट आयकर धाड टाकून १ कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा अंधेरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या गुन्ह्यात प्रत्यक्ष आयकर विभागाच्या दोन अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे उघडकीस आले असून, पोलिसांनी आतापर्यंत एकूण १० जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
सूरज मिश्रा (५७) आणि सुनील गोरे (५९) अशी अटक केलेल्या आयकर निरीक्षकांची नावे आहेत. त्यांच्यासह जितेंद्र मोरे व अशोक शिंदे यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वी संतोष खोपटकर, प्रेम सबनानी, विनय मोरे आणि तीन महिलांसह ६ जणांना अटक करण्यात आली होती.
हे ही वाचा:
चीनमध्ये मालवाहू जहाजाला लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू
स्थानिक चलनात व्यापाराला प्राधान्य
‘भारताविरोधात श्रीलंकेच्या भूमीचा वापर होऊ देणार नाही’
लालू कुटूंबाविरुद्ध मनी लाँड्रिंग आरोप निश्चित करा!
१७ जुलै रोजी तक्रारदार राजकुमार कन्डासमी यांच्या चकाला येथील ‘टु एम ऑप्थोट्रॉनिक्स प्रा. लि.’ या कार्यालयात आरोपींनी प्रवेश केला. कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करून व सीसीटीव्ही बंद करून त्यांनी बनावट सर्च वॉरंट दाखवले. गैरव्यवहाराचा धाक दाखवत आरोपींनी कारवाई टाळण्यासाठी १ कोटी रुपयांची मागणी केली. तीन तास दहशत माजवल्यानंतर आरोपी निघून गेले. कन्डासमी यांनी सीए आणि आयकर विभागाकडे चौकशी केली असता कोणतीही अधिकृत धाड पडली नसल्याचे निष्पन्न झाले.
फसवणूक लक्षात आल्यानंतर अंधेरी पोलिसांनी अपहरण, खंडणी व तोतयेगिरीप्रकरणी गुन्हा नोंदवला असून, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कर्पे पुढील तपास करत आहेत.
