पहेलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. पाकिस्तानला दणका दिला. वर्षभरानंतरचे चित्र पाहिले तर आपल्या लक्षात येईल, युद्धात झालेले नुकसान भरून काढून पाकिस्तान पुन्हा एकदा युद्धसज्ज झाला आहे. भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत, असे चित्र दिसत आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे गुडघ्यावर आलेल्या पाकिस्तानला वर्षभरात पुन्हा उभे करण्याची करणी अमेरिकेची आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत अमेरिकेचे शेपूट धरून चालत नाही, अमेरिकेच्या तालावर नाचत नाही, हे त्याचे एकमेव कारण. हाच डंख धरून अमेरिकेने पाकिस्तानसमोर हाडूक आणि मांसाचे तुकडे टाकण्याची रणनीती सुरू ठेवली आहे. ७ ऑगस्ट रोजी मक्का करार करून सौदी, तुर्कीये या देशांसोबत पाकिस्तानने 'इस्लामी नाटो'ची स्थापना केली आहे. हा करारसुद्धा पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या बळ देत आहे. ऑपरेशन सिंदूर राबवून अवघ्या चार दिवसांत भारताने पाकिस्तानचे तगडे नुकसान केले. आपल्या सेनादलांनी दहशतवाद्यांचे ९ प्रमुख दहशतवादी तळ नष्ट केले. पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात मुरीदके, बहावलपूर, सियालकोट, कोटली आदी ठिकाणी हे तळ होते. जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय 'मरकज सुभानल्ला' पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले. १०० हून अधिक दहशतवादी मारले, तितकेच पाकिस्तानी सैनिक मारले गेले. पाकिस्तानच्या नूर खान, मुसाफ यांसारख्या प्रमुख ११ एअरबेसच्या धावपट्ट्या, हँगर आणि कमांड सेंटर्सचे मोठे नुकसान झाले. पाकिस्तानचे ६ फायटर जेट्स, २ एअरबॉर्न वॉर्निंग सिस्टीम तसेच लाहोर-गुजरांवाला क्षेत्रातील रडार सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आल्या.
