सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलनाचे संकट वाढले आहे. पश्चिम सिक्कीममधील रिंबी गावात मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर आल्याने रिंबी-खेचुपेरी मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. भूस्खलनाच्या ठिकाणाजवळ असलेल्या दोन घरांनाही धोका निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सततच्या पावसामुळे डोंगरावरील माती सैल झाली असून आणखी भूस्खलन होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती, दगड आणि मलबा जमा झाल्याने वाहतूक पूर्ववत करण्याचे कामही अडचणीचे ठरत आहे. खराब हवामानामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डोंगराळ भागातील नागरिकांनी शक्यतो धोकादायक रस्त्यांवरून प्रवास टाळावा, असेही प्रशासनाने सांगितले आहे.
हे ही वाचा:
“ही माझ्याच जुन्या चुकांची शिक्षा आहे”
महत्त्वाच्या खनिजांचा शस्त्र म्हणून वापर प्रगतीला अडथळा !
झोमॅटोची कॅश ऑन डिलिव्हरीही आता महागणार
हे खरं आहे…रशियाने भारताकडून दीड लाख टन तेल विकत घेतलं
दरम्यान, सिक्कीमसोबतच पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगच्या डोंगराळ भागातही पावसाने मोठे नुकसान केले आहे. ताबाकुशी येथे रंगभांग नदीवरील तात्पुरत्या पुलाचे नुकसान झाले आहे. तर डुडहे परिसरातील बालासन नदीवरील पूलही वाहून गेला आहे. त्यामुळे अनेक भागांचा संपर्क विस्कळीत झाला आहे. काही दिवसांपूर्वी मिरिक परिसरात झालेल्या भूस्खलनामुळे रंगभांग नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला होता. त्यानंतर नदीचे पाणी वाढल्याने ताबाकुशीतील पुलालाही मोठा फटका बसला.
परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. काही कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. सिक्कीम आणि दार्जिलिंगमध्ये पावसाचा जोर कायम असल्याने पुढील काही दिवस नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. भूस्खलन आणि पुराचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.
