युक्रेन युद्धामुळे रशियाच्या ऊर्जा क्षेत्रावर वाढत असलेल्या दबावाचा थेट परिणाम आता भारत-रशिया इंधन व्यापारावर दिसून येत आहे. एकीकडे भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करत असताना, दुसरीकडे रशियालाच भारताकडून पेट्रोलियम उत्पादनांची आयात करण्याची वेळ आली आहे. ऑगस्ट महिन्यात रशियाने तब्बल १.७२ लाख टन पेट्रोलियम उत्पादनांची आयात केली. ही रशियाची आतापर्यंतची सर्वाधिक मासिक आयात असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, या आयातीपैकी जवळपास ७० टक्के हिस्सा भारताचा होता. भारताने ऑगस्टमध्ये रशियाला सुमारे १.२० लाख टन पेट्रोल निर्यात केले. या पेट्रोलची किंमत जवळपास ७.८ कोटी युरो असल्याचे सांगितले जाते. मागील महिन्याच्या तुलनेत ही निर्यात तब्बल सात पटींहून अधिक आहे.
हे ही वाचा:
९/११च्या हल्ल्यांपूर्वी ओसामाला भारतात करायचा होता हल्ला
मुंबईत कापसापासून साकारला बाप्पा
नाही प्रदूषण, नाही धूर; वंदे भारत आता पश्चिम घाटातून
‘कॉक्रोच पार्टी’ महाराष्ट्रात गरम पंजाबात नरम
रशियाला भारताकडून पेट्रोल मागवण्यामागे युक्रेनमधील युद्धाची मोठी भूमिका आहे. युक्रेनकडून रशियातील तेलशुद्धीकरण प्रकल्प आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर ड्रोन हल्ले सुरू आहेत. त्यामुळे अनेक रिफायनऱ्यांच्या कामकाजावर परिणाम झाला असून, देशांतर्गत पेट्रोल उत्पादनावर दबाव निर्माण झाला आहे. परिणामी रशियाला आपल्या बाजारातील इंधनाची मागणी पूर्ण करण्यासाठी परदेशातून पेट्रोलियम उत्पादनं आयात करावी लागत आहेत. याच संधीचा फायदा भारताच्या रिफायनिंग उद्योगाला होत आहे.
या व्यापारातील सर्वात विशेष बाब म्हणजे रशियाला पाठवण्यात आलेले पेट्रोल गुजरातमधील वाडीनार रिफायनरीमध्ये तयार करण्यात आले. या रिफायनरीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाचा मोठा हिस्सा रशियातून येतो. शिवाय, रशियाची सरकारी तेल कंपनी रोसनेफ्टची नायरा एनर्जीमध्ये ४९.१३ टक्के हिस्सेदारी आहे. म्हणजेच रशिया भारताला कच्चे तेल पुरवतो, भारत त्याचे शुद्धीकरण करून पेट्रोल तयार करतो आणि हेच पेट्रोल पुन्हा रशियाला निर्यात केले जात आहे. बदलत्या जागतिक ऊर्जा समीकरणात भारताची रिफायनिंग क्षमता आणि ऊर्जा व्यापारातील भूमिका किती महत्त्वाची ठरत आहे, याचे हे मोठे उदाहरण मानले जात आहे.
