गणेशोत्सव म्हटलं की भक्ती, श्रद्धा आणि बाप्पाच्या आकर्षक मूर्ती डोळ्यासमोर येतात. मात्र यंदा मुंबईत साकारण्यात आलेली गणेशमूर्ती आपल्या वेगळ्या संकल्पनेमुळे लक्ष वेधून घेत आहे. शुद्ध नैसर्गिक कापसापासून साकारलेली ही गणेशमूर्ती पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा अनोखा संदेश देत आहे.
या मूर्तीची संकल्पना ‘मातीपासून आत्म्यापर्यंतचा प्रवास’ या विचारावर आधारित आहे. मूर्तीमध्ये गणपती बाप्पा एका पृथ्वीच्या प्रतिकृतीवर विराजमान असून, त्यावर भारताचा नकाशा ठळकपणे दर्शवण्यात आला आहे. भारताच्या भूमीत कापूस पिकतो आणि याच नैसर्गिक उत्पादनातून बाप्पाची मूर्ती साकारण्यात आली आहे. त्यामुळे ज्या भूमीतून कापूस मिळतो, त्याच भूमीशी बाप्पाला जोडण्याचा प्रयत्न या संकल्पनेतून करण्यात आला आहे.
या मूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचे विसर्जन. मूर्ती शुद्ध कापसापासून तयार करण्यात आल्याने विसर्जनानंतर ती पाण्यात विरघळून पुन्हा निसर्गाच्या चक्रात सामावण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. त्यामुळे भक्ती आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम या मूर्तीतून पाहायला मिळतो. ही मूर्ती गणेशोत्सवातील पर्यावरणपूरक उपक्रमाचे उदाहरण ठरत आहे. बाप्पाची आराधना करतानाच आपल्या मातृभूमीचा आणि निसर्गाचा सन्मान करण्याचा संदेशही या माध्यमातून देण्यात आला आहे.
हे ही वाचा:
ब्रिक्समध्ये भारताची मोठी रणनीती
‘ब्रिक्स’मध्ये प्रवेशासाठी पाकिस्तानची तीन वर्षांपासून धडपड
चॅट जीपीटीच्या मदतीने बनवले होते पंतप्रधान कार्यालयाचे बनावट ओळखपत्र
ही अनोखी गणेशमूर्ती मूर्तिकार अनंत खैरनार यांनी साकारली आहे. अनंत खैरनार हे कापसापासून शिल्पनिर्मितीसाठी प्रसिद्ध असून, त्यांच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद आहे. या उपक्रमाला दिलीप वैती (विश्वविनायक) यांचे सहकार्य लाभले आहे. तसेच डॅनियल डायस, मोनिश परमार आणि नेल्सन डायस यांचाही या उपक्रमात सहभाग आहे.
