घरविशेषदीड फुटांचा बाप्पा... भक्ती मात्र आभाळाएवढी!

दीड फुटांचा बाप्पा… भक्ती मात्र आभाळाएवढी!

- Advertisement -

गणेशोत्सव म्हटला की डोळ्यांसमोर उभी राहते ती भव्य गणेशमूर्ती, आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई. मात्र, परळच्या कृष्णा बिल्डिंग क्रमांक ४ मधील नवचैतन्य बालसेवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा या भव्यतेपेक्षा भक्तीला अधिक महत्त्व देत एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे. मंडळ यंदा गणेशोत्सवाचे ७५वे वर्ष साजरे करत असून, गेली पाऊणशे वर्षे येथे विराजमान होणाऱ्या अवघ्या दीड फूट उंचीच्या गणरायाची परंपरा यंदाही तितक्याच श्रद्धेने कायम ठेवण्यात आली आहे.

“वेड उंचीचे नाही, भक्तीचे आहे!” हा संदेश देत मंडळाने छोट्या मूर्तीमागची मोठी श्रद्धा अधोरेखित केली आहे. गेली ७५ वर्षे कृष्णा बिल्डिंग क्रमांक ४ च्या तिसऱ्या मजल्यावर दीड फुटांचा बाप्पा विराजमान होतो. काळ बदलला, गणेशोत्सवाचे स्वरूप बदलले; मात्र मंडळाची ही परंपरा मात्र आजही तितक्याच भक्तिभावाने जपली जात आहे.

मूर्ती दीड फुटांची; पण सजावट मात्र भव्य!

यंदा मंडळाने मूर्तीची उंची न वाढवता सजावटीची उंची आणि सामाजिक आशय मोठा केला आहे. कृष्णा बिल्डिंगची भव्य सजावट करताना केवळ धार्मिक वातावरण निर्माण करण्यावर भर न देता, या शंभर वर्षांहून अधिक जुन्या पागडी इमारतीचा इतिहास, वर्तमान परिस्थिती आणि रखडलेल्या पुनर्विकासाचा प्रश्न प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.

काळाच्या ओघात जुन्या झालेल्या इमारतीत आजही अनेक कुटुंबे वास्तव्य करीत आहेत. इमारतीची अवस्था, रहिवाशांच्या समस्या, पुनर्विकासाच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न याकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या सजावटीतून करण्यात आला आहे.

गणरायाच्या चरणी पुनर्विकासासाठी साकडे

पागडी इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रश्नावर तोडगा निघावा आणि रहिवाशांना सुरक्षित व सन्मानजनक जीवन मिळावे, यासाठी महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम, १९९९ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात, अशी अपेक्षाही मंडळाने या माध्यमातून व्यक्त केली आहे.

“आमच्या इमारतीचा पुनर्विकास लवकरात लवकर मार्गी लागावा, रहिवाशांच्या समस्या दूर व्हाव्यात आणि संबंधित सर्वांना योग्य निर्णय घेण्याची सद्बुद्धी मिळावी,” अशी प्रार्थना करत मंडळाने हा सामाजिक विषय गणरायाच्या चरणी अर्पण केला आहे.

७५ वर्षांची परंपरा आणि सामाजिक बांधिलकी

गणेशोत्सव म्हणजे केवळ सजावट, रोषणाई आणि उत्सव नव्हे, तर समाजाशी जोडलेली आपली बांधिलकीही आहे, हा संदेश नवचैतन्य बालसेवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या सजावटीतून दिला आहे.

दीड फुटांच्या गणरायाची ७५ वर्षांची अखंड परंपरा… आणि त्याचवेळी भव्य सजावटीतून शंभर वर्षे जुन्या इमारतीची व्यथा मांडण्याचा प्रयत्न… भक्ती आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम या मंडळाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे.

म्हणूनच यंदाचा हा गणेशोत्सव केवळ आकर्षणाचा विषय ठरत नाही, तर “बाप्पा छोटा असला तरी त्याच्यापुढे मांडलेला प्रश्न मोठा आहे,” अशी जाणीव करून देणारा ठरतो आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version