घरक्राईमनामामालवणीत रिझवानने १४ वर्षीय मुलाच्या गळ्यावर फिरवला चाकू

मालवणीत रिझवानने १४ वर्षीय मुलाच्या गळ्यावर फिरवला चाकू

पोलिसांनी केली अटक

कोणतेही उघड कारण नसताना दोन जणांवर चाकूने हल्ला करून १४ वर्षीय मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना मालवणीतील न्यू कलेक्टर्स कम्पाउंड परिसरात शुक्रवारी सकाळी घडली. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी रिझवान कुरेशी (१९) याला अटक केली आहे. हल्ल्यानंतर तिसऱ्या व्यक्तीवर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या कुरेशीला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास कुरेशी गेट क्रमांक सहा परिसरातील एका दुकानात गेला. त्याने तेथे काही पैसे आणि पिण्यासाठी पाणी मागितले. दुकानात असलेल्या १४ वर्षीय बंटी खानने पैसे देण्यास नकार दिला; मात्र पाणी आणून देतो, असे सांगितले. बंटी पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर कुरेशीने चाकूने त्याच्या गळ्यावर वार केला.
हे ही वाचा:
नंदीग्राम पोटनिवडणुकीत ममतांची चहुबाजूंनी कोंडी

सह्याद्री क्रीडा मंडळाचा सुवर्ण महोत्सवी गणेशोत्सव

राहुल गांधींना काँग्रेसचाच इतिहास माहीत नाही!

“धर्म माणसाला बांधत नाही, तर मुक्त करतो”
बंटी गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाला. त्यानंतरही कुरेशी थांबला नाही. त्याने त्याच मार्गाने जाणाऱ्या चेतन पटेल यांच्यावरही चाकूने हल्ला करून त्यांच्या गळ्यावर वार केले. चेतन यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, कुरेशी पुढे एका घराजवळ गेला आणि तेथे तिसऱ्या व्यक्तीवर हल्ला करण्याच्या तयारीत होता. जखमींच्या किंकाळ्या ऐकून सतर्क झालेल्या स्थानिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि मारहाण केली. त्यानंतर पोलिसांना माहिती देऊन कुरेशीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
बंटीच्या वडिलांचा केटरिंगचा व्यवसाय असून त्यांचे कुटुंब दुकानाच्या वरील पहिल्या मजल्यावर राहते. बंटीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कुरेशी हा मूळचा उत्तर प्रदेशातील असून यापूर्वीही मालवणीत वास्तव्यास होता. त्यानंतर तो पुणे आणि हैदराबाद येथे राहिल्याचे पोलिसांनी सांगितले. सुमारे दहा दिवसांपूर्वी तो पुन्हा मालवणीत आला होता. चौकशीदरम्यान तो विविध दावे करत असून त्यांची पडताळणी पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणी मालवणी पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version