दिल्लीत सरकारी आदेशांचे कथित उल्लंघन, जंतरमंतरवर परवानगीशिवाय आंदोलन आणि अनधिकृत प्रवेश केल्याच्या प्रकरणांमध्ये चौकशीसाठी सीजेपीचे नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका हे दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेसमोर हजर झाले. राजौरी गार्डन येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयात दोघांची १३ ऑक्टोबर रोजी घडलेल्या घटनांसंदर्भात नियमित चौकशी करण्यात आली. ही चौकशी साधारण पाच तास सुरू होती.
चौकशीनंतर आशुतोष रांका याने पत्रकारांशी बोलताना सांगितले की, १३ ऑक्टोबरच्या घटनांबाबत सामान्य स्वरूपाची चौकशी करण्यात आली. आम्ही यापूर्वीही तपासात पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका मांडली आहे. चौकशीनंतर आशुतोष रांका याने तपासात पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली. जंतरमंतरसह सार्वजनिक ठिकाणी तिरंगा फडकवणे हा गुन्हा ठरू नये, असे तो म्हणाला. परदेशी निधीच्या आरोपांवरही त्याने प्रश्न उपस्थित करत सरकार देशातील बेरोजगारी, पेपरफुटी आणि मतचोरीसारख्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करत असल्याची टीका केली. दरम्यान, सौरभ दास यानेही परदेशी निधीचे आरोप निराधार असल्याचे सांगितले. या आरोपांचा पुरावा चार-पाच महिन्यांनंतरही समोर आलेला नाही. युवकांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला बदनाम करण्यासाठी नकारात्मक प्रचार केला जात असल्याचा आरोपही त्याने केला.
हे ही वाचा:
अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत भारतीय वंशाच्या उमेदवारांचा डंका
३३ वर्षांनंतर जंतरमंतर सर्वसामान्यांसाठी खुले!
लष्करासाठी गेमचेंजर ठरणार जीपीएस शिवाय ड्रोनला दिशा देणारे तंत्रज्ञान
राहुल गांधी पुन्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार?
जंतरमंतरला अधिकृत आंदोलनस्थळाचा दर्जा नसतानाही सीजेपीच्या सदस्यांनी बॅरिकेड्स ओलांडून खासगी जागेतून परिसरात प्रवेश केला होता. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या घटनेप्रकरणी दिल्लीतील कॅनॉट प्लेस आणि संसद मार्ग पोलीस ठाण्यांत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, विशेष कार्यकारी दंडाधिकारी (एसईएम) न्यायालयाने दोघांचे वैयक्तिक आणि जामीनपत्र स्वीकारल्यानंतर त्यांची सुटका केली होती. तसेच, शांतता राखणे आणि कायद्याचे पालन करणे याबाबत त्यांनी दिलेले लेखी हमीपत्रही न्यायालयाने नोंदवून घेतले होते.
