घरसंपादकीयसंसदीय अधिवेशनाआधी विदेश दौऱ्यांची भानगड काय?

संसदीय अधिवेशनाआधी विदेश दौऱ्यांची भानगड काय?

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी हे पुन्हा देशाबाहेर चालले आहेत. संसदीय अधिवेशनाआधी विदेशात जाण्याबाबत राहुल गांधींनी कमालीचे सातत्य दाखवले आहे. १६ ते १९ नोव्हेंबर त्यांचा अमेरिका दौरा आहे. राहुल गांधी आणि त्यांचे विदेश दौरे हे भारतीयांना न उलगडलेले गूढ आहे. केंद्र सरकारला कदाचित ते उलगडलेले असावे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे संकेत दिले. गुजरातमधील एका जाहीर सभेत त्यांनी या संदर्भात काही सूचक वक्तव्ये केली आहेत. मोदी हे गूढ उकलणार की फक्त पडदा उचलल्यासारखे करणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे!

रामलीला मैदानात इंडिया आघाडीची सभा साफ कोसळली. ४० टक्के रामलीला मैदानावर केवळ चिखल होता; उरलेल्या भागात मांडलेल्या खुर्च्याही भरल्या नव्हत्या. परंतु काँग्रेस नेत्यांनी मात्र सभेला अभूतपूर्व गर्दी लोटल्याचा दावा केला. हे दाखवायचे दात होते. प्रत्यक्षात सभेचा फ्लॉप शो झाल्यामुळे काँग्रेस नेते चवताळले आहेत. सभेला दांडी मारल्याबद्दल पक्षाध्यक्षांनी काँग्रेसच्या ८३ पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. युवक काँग्रेसच्या २०० पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सभा प्रचंड यशस्वी करण्याचे हे असले बक्षीस सर्वसामान्यांना कळण्याच्या पलीकडचे आहे.
हे ही वाचा:
हरदीपसिंग पुरी यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड

मुंबई हायकोर्टाने सचिन वाझेचा जामीन नाकारला

यूजीसीच्या वादग्रस्त नियमांचा केंद्र सरकार घेणार फेरआढावा

टाटा सन्सच्या अध्यक्षांची मेलोनी यांच्याशी भेट

रामलीला मैदानावर झालेली सभा, त्याआधी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात केलेले आंदोलन यामुळे राहुल गांधी प्रचंड थकलेले असणार, ब्रेक घेण्यासाठी ते विदेशात जाणार, अशी चर्चा होतीच. अपेक्षेनुसार ते अमेरिकेत जात आहेत. सर्वोच्च न्यायालयावर नेलेल्या मोर्चानंतरही त्यांनी चार दिवसांचा व्हिएतनाम दौरा केला. आता त्यांना अमेरिकेचे वेध लागले आहेत.

लोकसभा अध्यक्षांनी अद्याप संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे सत्रावसान केलेले नाही, अधिवेशनाची अधिकृत समाप्ती झालेली नाही आणि आता हिवाळी अधिवेशन अगदीच तोंडावर आलेले आहे. गेले अधिवेशन विरोधकांच्या गोंगाटामुळे वाया गेले. लोकसभा-विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे नारीशक्ती वंदन विधेयक, लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना विधेयक आणि अमेरिकेतून प्रचंड विरोध होत असलेले सुधारित एफसीआरए (FCRA) विधेयक गेल्या वेळी लोंबकळले. विरोधकांच्या प्रचंड गोंधळामुळे यापैकी एकही विधेयक मंजूर होऊ शकले नाही. एफसीआरए विधेयकाला अमेरिकेतील अनेक काँग्रेस सदस्यांनी जाहीरपणे विरोध केला आहे. जगातील अनेक देशांनी या विधेयकाच्या विरोधात भूमिका मांडली आहे. त्यामुळे यंदाचे अधिवेशन महत्त्वाचे आहे. त्याआधी फिल्डिंग लावण्यासाठी राहुल गांधी विदेशात जात आहेत, असे मानायला वाव आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेतच राहुल गांधींच्या विदेश यात्रांचा २०१५ पासूनचा तपशील मांडला होता. २०२५ च्या शीतकालीन सत्रादरम्यान राहुल गांधी जर्मनी दौऱ्यावर होते, २०२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात ते व्हिएतनाम दौऱ्यावर, २०२३ च्या अर्थसंकल्पीय सत्रादरम्यान इंग्लंड, २०२० च्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विदेश यात्रेवर, २०१८ च्या अर्थसंकल्पीय सत्रादरम्यान सिंगापूर-मलेशिया, तर २०१५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ते विदेशातच होते. भारतापेक्षा त्यांचे मन विदेशातच रमते, हे उघड आहे. ते विदेशात काय करतात, कोणाला भेटतात, तिथे नेमके काय शिजते, याबाबत कमालीची गुप्तता पाळली जाते. आता ते पुन्हा अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. ही वेळसुद्धा महत्त्वाची आहे.

अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीचे निकाल काल समोर आले. रिपब्लिकन पक्षाचा दणदणीत पराभव झाला आहे. डेमोक्रॅट्सची ताकद वाढली आहे. अमेरिकेत अशी राजकीय धामधूम सुरू असताना राहुल गांधी १६ ते १९ नोव्हेंबर या काळात तिथे जात आहेत. अनिवासी भारतीय, विद्यार्थी, विविध विद्यापीठांचे प्राध्यापक, विचारवंत आणि व्यावसायिक यांच्याशी ते संवाद साधणार आहेत. जागतिक स्तरावर भारतीय लोकशाहीचे भवितव्य, तंत्रज्ञान आणि आर्थिक धोरणांवर चर्चा करणे हा यामागील मुख्य हेतू मानला जातो.

हे कार्यक्रम अर्थातच जगाला सांगण्यासाठी असतात. त्यांची खरी कार्यक्रमपत्रिका आणि त्यामागे दडलेला उद्देश केवळ त्यांना, सोनिया गांधींना आणि अमेरिकेत गांधी घराण्याचे हितसंबंध सांभाळणाऱ्या सॅम पित्रोदा यांनाच ठाऊक असतो. पित्रोदा हे सोरोसशरण आहेत. ‘जॉर्ज सोरोस काही चांगल्या कामांसाठी भारतात १० अब्जांची गुंतवणूक करत असतील, तर त्याचा विचार केला जाऊ शकतो,’ हे पित्रोदा यांचे ताजे वक्तव्य आहे.

सोरोस हे फक्त एनजीओंमध्ये (NGOs) गुंतवणूक करतात आणि त्यांचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी त्यांचा वापर करतात, हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. भारतातही त्यांनी अशी भरपूर गुंतवणूक केलेली आहे. त्यांना मोदींना सत्तेवरून हटवण्यात रस आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांना त्यांच्यात रस आहे.

ट्रम्प यांनी सोरोस यांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली होती, कारण सोरोस हे डेमोक्रॅट्सच्या जवळचे आहेत. ट्रम्प यांचे ते विरोधक मानले जातात. मध्यावधीत डेमोक्रॅट्सना चांगले यश मिळाल्यानंतर बहुधा ते बिळातून बाहेर येण्याची शक्यता आहे. अमेरिका दौऱ्यात राहुल गांधी सोरोस नेटवर्कशी गाठीभेटी करण्याचा प्रयत्न करतील, अशी शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच राहुल गांधींच्या विदेशी कनेक्शनवर हल्लाबोल केला. राहुल गांधींचे विदेश कनेक्शन चव्हाट्यावर आणण्याचे बहुधा त्यांनी मनावर घेतले आहे. ३१ ऑक्टोबर रोजी गुजरातमध्ये एका कार्यक्रमात मोदी म्हणाले,

परदेशात जाऊन गुप्तपणे कोण कोणाला भेटतात? भारतविरोधी शक्तींना कोण पाठिंबा देत आहे? भारताच्या शत्रूंची भाषा कोण बोलत आहे? हे सर्व प्रकार आपल्याला ओळखावे लागतील… विशेषतः ज्या पद्धतीने सोशल मीडियाचा वापर हत्यार म्हणून केला जात आहे, अफवा पसरवल्या जात आहेत आणि भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, या आव्हानांचा सामना करण्यासाठी देशातील जनतेने एकत्र आले पाहिजे.

वक्तव्य थेट राहुल गांधी यांचे नाव घेऊन करण्यात आलेले नसले, तरी त्याचा रोख अत्यंत स्पष्ट होता. मोदींचे वक्तव्य राहुल गांधी यांच्या वर्मी लागले. त्यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, मोदीजी, या देशाशी खोटे बोलणे बंद करा. तुम्ही परदेशी मदतीमुळेच पंतप्रधान बनलात आणि परदेशी मदतीच्या जोरावरच पंतप्रधानपदावर आहात. तुमची संपूर्ण आर्थिक व्यवस्था परदेशी लोकांच्या नियंत्रणात आणि समर्थनावर चालते. परदेशी सोशल मीडिया पूर्णपणे तुमच्या पाठीशी उभा आहे. मी तुम्हाला या मुद्द्यावर खुल्या चर्चेचे आव्हान देतो. कोणतेही व्यासपीठ, कोणतीही वेळ! हिंमत असेल तर या! पण तुम्ही येणार नाही, कारण मला तुमच्याबद्दल जी माहिती आहे, त्यामुळे तुम्ही घाबरलेले आहात.

राहुल गांधींच्या या आव्हानावर अमित शहा जाहीर सभेत कडाडले. ते म्हणाले, संसद चालू तर द्या, तुमच्या प्रत्येक मुद्द्यावर समोरासमोर चर्चा करू, संसदेत होऊन जाऊ दे दोन-दोन हात!

राहुल गांधींच्या खुल्या चर्चेच्या आव्हानाबाबत काय म्हणावे? देशातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये निकोप चर्चा व्हावी म्हणूनच संसदेचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. तिथे राहुल गांधी आणि त्यांचे समर्थक फक्त गोंधळ घालतात. अनेकदा आरोपांच्या फैरी झाडून त्याची उत्तरे ऐकण्याची वेळ येते, तेव्हा राहुल गांधींनी पळ काढलेला आहे. त्यामुळे त्यांच्या चर्चेच्या आव्हानाला फार अर्थ उरत नाही.

राहुल गांधी विदेशात का जातात, हे सगळ्यांना माहिती आहे, असे वक्तव्य गृहमंत्री अमित शहा यांनी इंडिया टुडे समूहाच्या एका कार्यक्रमात केले होते. त्याबाबत खोलात जाऊन पत्रकार राहुल कंवल यांनी प्रश्न केला, तेव्हा ते म्हणाले, जाऊ दे, मला इतरांच्या वैयक्तिक बाबींबद्दल बोलायचे नाही. संसदेत त्यांनी कायम राहुल गांधींच्या विदेश यात्रांच्या टायमिंगवर प्रश्न विचारला होता. अमेरिकेतून ते परत येतील तेव्हा काही फोटो बाहेर येतील की त्याचा काही तपशीलसुद्धा जनतेसमोर उघड होईल? की हा विषयसुद्धा राहुल गांधींच्या बेनामी संपत्ती आणि त्यांचे तथाकथित विदेशी नागरिकत्व या विषयांसारखा लोंबकळत राहील?

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version