घरविशेषजनसंख्या नियंत्रणासाठी 3 मुलांची मर्यादा आवश्यक : मोहन भागवत

जनसंख्या नियंत्रणासाठी 3 मुलांची मर्यादा आवश्यक : मोहन भागवत

जनसंख्या नियंत्रण आणि समतोल राखणे समाज आणि राष्ट्राच्या भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक कुटुंबाने जास्तीत जास्त तीन मुलांपर्यंत मर्यादित राहावे, जेणेकरून जनसंख्या योग्य आणि नियंत्रणात राहील असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित 3 दिवसीय व्याख्यान मालेंतर्गत तिसरे आणि अंतिम व्याख्यानपुष्प गुंफतांना ते बोलत होते. यावेळी त्यांनी संघ आणि संघाशी संबंधीत प्रश्नांना उत्तरे देखील दिली.

याप्रसंगी सरसंघचालकांनी सांगितले की, फक्त संख्या महत्त्वाची नाही, तर त्या मागील हेतूही तितकाच महत्त्वाचा आहे. जनसंख्या किती आहे यापेक्षा ती का आहे, हे महत्त्वाचे आहे. जनसंख्येतील असमानता अनेकदा गंभीर परिणाम घडवते, जसे की फाळणीसारख्या परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे या विषयावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. भारतातील जनसंख्या असंतुलनाचे एक कारण म्हणजे जबरदस्तीने किंवा प्रलोभन देऊन होणारे धर्मांतर असून, ते थांबविणे आवश्यक आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, “धर्म हा वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे, पण कोणालाही जबरदस्तीने धर्म बदलायला लावणं हे चुकीचे आहे. हे रोखणे ही समाज आणि सरकार दोघांचीही जबाबदारी असल्याचे भागवत म्हणाले.

डॉ. भागवत यांनी स्पष्ट केले की भारतातील सर्व नागरिकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजेत. ते म्हणाले, “जर कोणी व्यक्ती कायदेशीरपणे परवानगी घेऊन येत असेल, तर त्याला काम मिळू शकते. पण जे लोक बेकायदेशीर मार्गाने देशात येतात, त्यांच्यासाठी जागा असू नये.”

जन्मदर नियंत्रणावर त्यांनी विशेष भर दिला आणि सांगितले की, 2.1 ही संख्या ही मानव सभ्यता टिकवून ठेवण्यासाठी आदर्श मानली जाते, जी प्रत्यक्षात तीन मुलांच्या समतुल्य आहे. ते म्हणाले, “मुलं तीनच हवीत, त्यापेक्षा जास्त नाहीत. हा विचार सर्वांनी स्वीकारला पाहिजे. संसाधनांचा समतोल वापर आणि समाजातील स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी जनसंख्येवर नियंत्रण आवश्यक आहे.

घुसखोरीबाबत सरसंघचालक म्हणाले की, प्रत्येक देशासारखे भारताचेही स्वतःचे कायदे आणि मर्यादित संसाधने आहेत, त्यामुळे बेकायदेशीर स्थलांतर स्वीकारता येणार नाही. ते म्हणाले की, सरकार या दिशेने पावले उचलत आहे, पण समाजानेही जागरूक राहिले पाहिजे. “अवैध स्थलांतर करणाऱ्यांची ओळख पटवली पाहिजे, त्यांची तक्रार करावी लागेल आणि त्यांना रोजगार दिला जाऊ नये. जर रोजगार द्यायचाच असेल, तर प्रथम आपल्याच देशातील नागरिकांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे.

भाषा आणि संस्कृतीबाबत डॉ. भागवत म्हणाले की, भारतात जन्मलेल्या सर्व भाषा या राष्ट्रीय भाषा आहेत. त्यांनी सांगितले की, व्यवहारासाठी एक सामान्य भारतीय भाषा असावी, पण ती परकीय असू नये. “इंग्रजी शिकण्यात काहीच वाईट नाही, पण आपल्या मातृभाषेचा आणि संस्कृतीचा त्याग होऊ नये,” असे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version