चंद्रपूरमध्ये तब्बल ५०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह मोठा स्टील प्रकल्प उभा राहणार आहे. या प्रकल्पाकडे केवळ एक मोठी औद्योगिक गुंतवणूक म्हणून पाहून चालणार नाही, तर त्यामागचा व्यापक बदल लक्षात घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचा औद्योगिक विकास गेल्या काही दशकांत मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक औद्योगिक केंद्रांच्या माध्यमातून पुढे गेला. या भागांमध्ये उद्योगांची उभारणी झाली, गुंतवणूक वाढली आणि मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. आता याच औद्योगिक विकासाचा विस्तार राज्याच्या पूर्वेकडील भागांकडेही होताना दिसत आहे. म्हणजेच, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचा नकाशा आता आणखी विस्तारताना दिसत आहे. चंद्रपूरमधील हा ५०,००० कोटी रुपयांचा प्रकल्प त्या बदलाचे एक महत्त्वाचे उदाहरण ठरणार आहे.
महाराष्ट्राच्या या भागाकडे पाहिले तर एक वेगळेच चित्र दिसते. चंद्रपूर आणि गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांकडे नैसर्गिक संसाधनांची कमतरता कधीच नव्हती. खनिजसंपत्ती, जंगल, जमीन आणि ऊर्जा— या प्रदेशाकडे विकासासाठी आवश्यक असलेली मोठी क्षमता आहे. मात्र या क्षमतेला उद्योग, गुंतवणूक आणि मोठ्या प्रमाणावर रोजगाराशी जोडण्याचे काम अपेक्षित वेगाने होऊ शकले नाही. दीर्घकाळ हा भाग नक्षलवादाच्या छायेत होता. त्यामुळे विकासासमोर सुरक्षेचेही मोठे आव्हान होते. गेल्या काही वर्षांत मात्र परिस्थिती बदलण्याच्या दिशेने प्रयत्न झाले. सुरक्षा व्यवस्थेसोबतच रस्ते, पायाभूत सुविधा, शिक्षण, रोजगार आणि विकासाच्या माध्यमातून या भागाला मुख्य प्रवाहाशी जोडण्यावर भर देण्यात आला. बंदुकीच्या सावटातून विकासाच्या संधींकडे जाणारा हा बदल या संपूर्ण प्रदेशासाठी महत्त्वाचा आहे.
चंद्रपूरमध्ये उभारला जाणारा प्रकल्प नेमका काय आहे?
श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीने महाराष्ट्र सरकारसोबत केलेल्या सामंजस्य कराराअंतर्गत चंद्रपूरमध्ये एकात्मिक स्टील कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे. हा ग्रीनफिल्ड प्रकल्प आहे. म्हणजेच, आधीपासून अस्तित्वात असलेल्या स्टील प्लांटचा विस्तार नाही, तर नव्याने संपूर्ण औद्योगिक संकुल उभारले जाणार आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये विकसित केला जाणार असून, त्यासाठी ५०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.
या प्रकल्पाची महत्त्वाची बाब म्हणजे, इथे केवळ स्टील उत्पादन होणार नाही, तर कच्च्या मालापासून तयार स्टीलपर्यंतची एकात्मिक उत्पादन साखळी उभारली जाणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे, तर लोखंडाचे धातुक कारखान्यात आल्यानंतर त्यावर टप्प्याटप्प्याने प्रक्रिया केली जाते. त्यातून आयर्न मेकिंग, त्यानंतर स्टील मेल्टिंग आणि कास्टिंग, आणि पुढे रोलिंग-फिनिशिंगसारख्या प्रक्रियांमधून तयार स्टीलला आवश्यक आकार आणि स्वरूप दिले जाते. या संपूर्ण साखळीतील विविध युनिट्स एकाच औद्योगिक कॉम्प्लेक्समध्ये जोडली जाणार आहेत. यामध्ये पेलेटायझेशन, सिंटरिंग, कोक, आयर्न मेकिंग, स्टील मेल्टिंग, कास्टिंग आणि रोलिंग यांसारख्या युनिट्सचा समावेश असेल.
प्रकल्पाचा विस्तार आणि उत्पादन क्षमता
हा प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये विकसित केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ३.७५ दशलक्ष टन म्हणजेच ३७.५ लाख टन प्रतिवर्ष उत्पादन क्षमता उभी केली जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी ५.२५ दशलक्ष टन म्हणजेच ५२.५ लाख टन प्रतिवर्ष क्षमता जोडली जाईल. दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर या एकात्मिक स्टील कॉम्प्लेक्सची एकूण उत्पादन क्षमता ९ दशलक्ष टन म्हणजेच ९० लाख टन स्टील प्रतिवर्ष इतकी होईल.
मात्र एवढ्या मोठ्या क्षमतेचा प्रकल्प उभारताना केवळ उत्पादन क्षमता पुरेशी नसते. त्यासाठी कच्चा माल, ऊर्जा आणि वाहतुकीची सक्षम व्यवस्था तितकीच महत्त्वाची असते. आणि या सगळ्यांचा विचार केला, तर चंद्रपूरची भौगोलिक आणि औद्योगिक स्थिती या प्रकल्पासाठी महत्त्वाची ठरते. चंद्रपूरच्या आसपासचा परिसर खनिजसंपत्तीच्या दृष्टीने समृद्ध आहे. गडचिरोलीमध्ये लोहखनिजाचे साठे आहेत, तर चंद्रपूरचा परिसर कोळशाच्या उपलब्धतेसाठी ओळखला जातो. याशिवाय चुनखडी आणि डोलोमाइटसारखा आवश्यक कच्चा मालही या भागात उपलब्ध आहे. त्यामुळे स्टील उद्योगासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या संसाधनांच्या जवळच एवढ्या मोठ्या क्षमतेचा प्रकल्प उभारण्याला विशेष महत्त्व प्राप्त होते.
पण फक्त कच्चा माल जवळ असणे पुरेसे नाही. तो प्रकल्पापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि तयार स्टील देशातील विविध बाजारपेठांमध्ये पाठवण्यासाठी मजबूत वाहतूक व्यवस्था आवश्यक असते. चंद्रपूरला रेल्वे आणि रस्ते कनेक्टिव्हिटी उपलब्ध असल्यामुळे या दृष्टीनेही या ठिकाणाला महत्त्व आहे. त्यासोबतच मोठ्या औद्योगिक प्रकल्पासाठी आवश्यक असलेली वीज उपलब्धताही या परिसराच्या औद्योगिक क्षमतेतील महत्त्वाचा घटक आहे. म्हणजेच एका बाजूला लोहखनिज, कोळसा, चुनखडी आणि डोलोमाइटसारखी संसाधने, तर दुसऱ्या बाजूला रेल्वे, रस्ते आणि ऊर्जा पायाभूत सुविधा—या दोन्ही गोष्टी एकाच भौगोलिक पट्ट्यात उपलब्ध असल्याने चंद्रपूरची निवड महत्त्वाची ठरते. आणि म्हणूनच ५०,००० कोटी रुपयांचा हा प्रकल्प चंद्रपूरमध्ये येणे ही केवळ एका मोठ्या कारखान्याची उभारणी नाही. उपलब्ध नैसर्गिक संसाधनांना मोठ्या औद्योगिक क्षमतेशी जोडण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.
प्रकल्पाचा प्रत्यक्ष फायदा चंद्रपूरला आणि विदर्भाला कसा मिळणार?
प्रकल्पातून सुमारे १०,००० थेट आणि २०,००० अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. त्यामुळे चंद्रपूरच्या औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. उत्पादन, तांत्रिक सेवा, देखभाल, व्यवस्थापन आणि विविध सहाय्यक कामांमध्ये स्थानिक मनुष्यबळासाठी नव्या संधी निर्माण होतील. यासोबतच या प्रकल्पामुळे स्थानिक उद्योगांसाठी मोठी बाजारपेठ तयार होणार आहे. औद्योगिक साहित्य, यंत्रसामग्री, दुरुस्ती-देखभाल, फॅब्रिकेशन, वाहतूक आणि लॉजिस्टिक्स अशा अनेक क्षेत्रांतील सेवांची गरज निर्माण होणार असल्याने चंद्रपूर आणि आसपासच्या भागातील लघु-मध्यम उद्योग या औद्योगिक साखळीशी जोडले जाणार आहेत.
या औद्योगिक विस्ताराचा परिणाम स्थानिक अर्थव्यवस्थेवरही दिसणार आहे. नव्या रोजगारातून निर्माण होणारे उत्पन्न, उद्योगांना मिळणारी आणि वाढणारी सेवा क्षेत्रातील मागणी यामुळे चंद्रपूरमध्ये आर्थिक उलाढाल वाढणार आहे. त्याचा फायदा निवास, वाहतूक, व्यापार आणि इतर स्थानिक सेवांनाही मिळणार आहे.
या प्रकल्पाची ९० लाख टन प्रतिवर्ष उत्पादन क्षमता लक्षात घेतली, तर त्याचे महत्त्व आणखी स्पष्ट होतं. या प्रकल्पातून तयार होणारे स्टील पायाभूत सुविधा, बांधकाम, ऑटोमोबाईल, रेल्वे, नवीकरणीय ऊर्जा, तेल-गॅस आणि हेवी इंजिनिअरिंगसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांशी जोडले जाणार आहे. यामुळे चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर स्टील उत्पादनासोबतच त्याभोवती पूरक उद्योगांची साखळीही विकसित होणार आहे. फॅब्रिकेशन, इंजिनिअरिंग, औद्योगिक सेवा आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला यामुळे नवी चालना मिळणार आहे. त्यातून चंद्रपूरच्या औद्योगिक परिसंस्थेचा विस्तार होणार आहे. म्हणजेच ५०,००० कोटी रुपयांची ही गुंतवणूक चंद्रपूरच्या अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर भांडवल आणणार आहे आणि त्यासोबत रोजगार, उद्योग आणि व्यवसायाच्या नव्या संधींची दारं उघडणार आहे. या सगळ्यामुळे चंद्रपूरचे औद्योगिक महत्त्व आणखी वाढणार आहे आणि विदर्भाच्या औद्योगिक विकासाला एक नवी दिशा मिळणार आहे. या सगळ्यामुळे चंद्रपूरमध्ये एवढी मोठी गुंतवणूक येणं, ही केवळ एका मोठ्या उद्योगाची घोषणा राहत नाही. पूर्व विदर्भाच्या औद्योगिक चित्रात होत असलेल्या बदलाकडे पाहण्याच्या दृष्टीनेही हा महत्त्वाचा टप्पा ठरतो.
चंद्रपूरकडे मोठ्या उद्योगांसाठी आवश्यक असलेली काही मूलभूत ताकद आधीपासूनच आहे. खनिजसंपत्ती, ऊर्जा निर्मितीची क्षमता आणि रेल्वे-रस्ते कनेक्टिव्हिटी यामुळे या भागाला औद्योगिक आधार मिळतो. पण नैसर्गिक संसाधने उपलब्ध असणे आणि त्या आधारावर मोठी गुंतवणूक प्रत्यक्षात येणे, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यासाठी उद्योगांना आणखी एक गोष्ट आवश्यक असते—स्थिर आणि विश्वासार्ह वातावरण.
याच ठिकाणी पूर्व विदर्भाच्या मागील काही दशकांचा संदर्भ महत्त्वाचा ठरतो. महाराष्ट्रातील गडचिरोलीसह छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागांपर्यंत पसरलेल्या प्रदेशात नक्षलवादाचा प्रभाव राहिला. दुर्गम भौगोलिक परिस्थिती आणि हिंसाचारामुळे या भागांमध्ये केवळ उद्योगच नव्हे, तर रस्ते, दूरसंचार, बँकिंग, शिक्षण आणि प्रशासनाची नियमित पोहोच निर्माण करणेही मोठे आव्हान होते. म्हणून नक्षलवादाचा प्रश्न हा केवळ सुरक्षेचा प्रश्न नव्हता. त्याचा थेट संबंध विकासाच्या गतीशीही होता. एखाद्या भागात सरकारची आणि प्रशासनाची पोहोच मर्यादित असेल, कनेक्टिव्हिटी कमकुवत असेल आणि सुरक्षेची अनिश्चितता असेल, तर मोठ्या उद्योगांसाठी दीर्घकालीन गुंतवणुकीचे निर्णय घेणं स्वाभाविकपणे कठीण होते.
गेल्या काही वर्षांत केंद्रातील मोदी सरकारने याच समीकरणावर एकाच वेळी दोन आघाड्यांवर काम केले- सुरक्षा आणि विकास. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली नक्षल विरोधातील कारवायांसोबत सुरक्षा दलांची उपस्थिती, रस्ते आणि दूरसंचार कनेक्टिव्हिटी, तसेच दुर्गम भागांमध्ये सरकारी योजनांची पोहोच वाढवण्यावर भर देण्यात आला. याचा परिणाम केवळ नक्षलवादाचा भौगोलिक प्रभाव कमी होण्यात झाला नाही; तर ज्या भागांमध्ये राज्याची उपस्थिती पूर्वी मर्यादित होती, तिथे प्रशासन आणि पायाभूत सुविधांची पोहोचही वाढली.
केंद्र सरकारने २०२६ मध्ये देशातील नक्षलवादाचा प्रभाव जवळपास संपुष्टात आल्याचे जाहीर केले. या बदलामुळे पूर्वी सुरक्षा आणि कनेक्टिव्हिटी ही मोठी आव्हाने असलेल्या भागांमध्ये गुंतवणुकीसाठी आवश्यक वातावरण अधिक अनुकूल झालं, असे म्हणता येईल. आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या औद्योगिक धोरणाकडे पाहावे लागेल. आताचे फडणवीस सरकार आणि यापूर्वीचे शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली राज्याने पूर्व विदर्भातील खनिजसंपत्तीचा केवळ उत्खननासाठी वापर न करता, त्याच ठिकाणी प्रक्रिया आणि उत्पादन उद्योग उभारण्याची दिशा पुढे नेली. म्हणजे लोहखनिज बाहेर पाठवून त्यावर दुसरीकडे मूल्यवर्धन करण्याऐवजी, खनिज जिथे उपलब्ध आहे तिथेच त्याभोवती मोठी औद्योगिक साखळी उभी करण्याचा प्रयत्न. केंद्रातील सरकारसोबत डबल इंजिन म्हणून काम करून राज्याला विकासाच्या वाटेवर अधिक सक्षमपणे पुढे नेण्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे योगदान दिसून आले.
हे ही वाचा:
दीपके, रांका, सौरव दासला पोलिसांनी विमानातच घेतले ताब्यात
आंदोलनापूर्वीच ध्रुव राठीला घरातून उचलले
भारतावर शुल्क लादणारे ट्रम्प आता डिझेलसाठी पुतीन यांच्या दारी
अमेरिकेच्या ग्रीन कार्ड निर्णयावर भारताचा स्पष्ट इशारा
गडचिरोली हे याच बदलाचे महत्त्वाचे उदाहरण आहे. जिल्ह्यातील मोठ्या लोहखनिज साठ्यामुळे स्टील उद्योगासाठी आवश्यक असलेला कच्चा माल स्थानिक पातळीवर उपलब्ध होतो. त्यामुळे खाण, प्रक्रिया, पेलेट, आयर्न मेकिंग, स्टील उत्पादन अशी साखळी तयार करण्याची क्षमता इथे आहे. गेल्या काही वर्षांत राज्य सरकारने गडचिरोलीला स्टील हब म्हणून विकसित करण्याची दिशा मांडली आणि त्याच काळात मोठ्या औद्योगिक गुंतवणुकीचे प्रस्तावही पुढे आले.
लॉयड्स मेटल्ससारख्या कंपन्यांचा विस्तारही याच व्यापक बदलाचा भाग म्हणून पाहता येतो. पेलेट प्लांट, ग्राइंडिंग युनिट आणि स्लरी पाइपलाइन यांसारख्या सुविधांमुळे केवळ खाणकामावर आधारित अर्थव्यवस्थेऐवजी खनिजावर प्रक्रिया करून त्याचं पुढे मूल्यवर्धन करण्याची औद्योगिक साखळी तयार होत आहे. म्हणून चंद्रपूरमधील ५०,००० कोटी रुपयांचा प्रकल्प आणि गडचिरोलीतील वाढता स्टील उद्योग हे दोन स्वतंत्र प्रकल्प असले, तरी त्यामागे एक समान दिशा दिसते—पूर्व विदर्भातील नैसर्गिक संसाधनांना स्थानिक औद्योगिक क्षमतेमध्ये रूपांतरित करण्याची.
भारतात तयार होणाऱ्या स्टीलसाठी बाजार कुठे आहे?
भारताच्या स्टीलच्या मागणीमध्ये सर्वात मोठा वाटा हाउसिंग आणि कन्स्ट्रक्शन क्षेत्राचा आहे. रस्ते, पूल, रेल्वे, मेट्रो, विमानतळ, औद्योगिक इमारती आणि गृहनिर्माण अशा विविध क्षेत्रांमध्ये स्टीलचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यानंतर पायाभूत सुविधा, इंजिनिअरिंग आणि पॅकेजिंग, ऑटोमोबाईल आणि संरक्षण क्षेत्राचा वाटा येतो. उपलब्ध सरकारी आकडेवारीनुसार, स्टीलच्या मागणीमध्ये हाउसिंग आणि कन्स्ट्रक्शनचा वाटा ४३ टक्के, इन्फ्रास्ट्रक्चरचा २५ टक्के, इंजिनिअरिंग आणि पॅकेजिंगचा २२ टक्के, ऑटोमोबाईलचा ९ टक्के आणि संरक्षण क्षेत्राचा १ टक्का आहे. म्हणजे स्टीलची मागणी ही एखाद्या एका उद्योगावर अवलंबून नाही. देशात पायाभूत सुविधा उभ्या राहत असतील, घरबांधणी वाढत असेल, वाहननिर्मिती आणि मॅन्युफॅक्चरिंगचा विस्तार होत असेल, तर त्याच वेळी स्टीलची गरजही वाढत जाते.
२०२४ मध्ये भारताने १४९.४ दशलक्ष टन कच्च्या स्टीलचे उत्पादन केले आणि भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा क्रूड स्टील उत्पादक देश ठरला. मात्र एवढ्या मोठ्या उत्पादन क्षमतेनंतरही फिनिश स्टीलच्या बाबतीत देशांतर्गत मागणी आणि उपलब्ध उत्पादन यांचे समीकरण कायम महत्त्वाचे राहते. याचे उदाहरण भारताच्या स्टील व्यापारातून दिसते. २०२४-२५ मध्ये भारताने ९.५५ दशलक्ष टन फिनिश स्टील आयात केले, तर निर्यात ४.८६ दशलक्ष टन राहिली. त्यामुळे प्रश्न केवळ भारत किती स्टील तयार करतो, एवढाच नाही; तर देशांतर्गत उद्योगांना आवश्यक असलेले स्टील योग्य प्रमाणात, योग्य दर्जात आणि स्पर्धात्मक पद्धतीने देशात उपलब्ध होते आहे का, हाही आहे.
याच कारणामुळे भारताच्या स्टील धोरणात उत्पादन क्षमता वाढवण्यासोबतच उच्च दर्जाचे ऑटोमोटिव्ह स्टील, इलेक्ट्रिकल स्टील, स्पेशल स्टील आणि स्ट्रॅटेजिक वापरासाठी लागणाऱ्या अलॉयची देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. नॅशनल स्टील पॉलिसी, २०१७ ने २०३०-३१ पर्यंत अशा उच्च दर्जाच्या स्टीलची देशांतर्गत मागणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
म्हणूनच चंद्रपूरमधील ५०,००० कोटी रुपयांचा हा प्रकल्प केवळ ९० लाख टन अतिरिक्त स्टील उत्पादनाची क्षमता नाही. खनिजसंपत्ती, ऊर्जा आणि कनेक्टिव्हिटीचा आधार असलेल्या चंद्रपूरला मोठ्या औद्योगिक गुंतवणुकीशी जोडणारा हा महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रकल्पामुळे रोजगार, पूरक उद्योग आणि स्थानिक व्यवसायांसाठी नव्या संधी निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर देशाची वाढती स्टीलची मागणी पूर्ण करण्यासाठी देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवण्याच्या दृष्टीनेही हा प्रकल्प महत्त्वाचा ठरू शकतो. म्हणजेच, आजची ५०,००० कोटींची गुंतवणूक ही केवळ चंद्रपूरच्या औद्योगिक विकासाची संधी नाही, तर भारताच्या वाढत्या औद्योगिक गरजांसाठी देशांतर्गत स्टील क्षमता मजबूत करण्याच्या मोठ्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकते.
